विश्वचषक काही तासांवर येऊन ठेपला असताना या स्पर्धेतील सर्वाधिक विक्रम असलेला भारताचा माजी महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळाडूंसाठी काही कानमंत्र दिले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वातावरण, खेळपट्टय़ा आणि त्यावर कसा खेळ करायला हवा, याबाबत सचिनने आपली मते व्यक्त केली आहेत.
‘‘पर्थ आणि ब्रिस्बेनची खेळपट्टी ही वेगासाठी ओळखली जाते. या खेळपट्टय़ांवर चेंडू जलद आणि उसळी घेऊन येतात. त्यामुळे या खेळपट्टय़ांवर फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही सजग राहण्याची गरज असते. जर फलंदाजांनी वेग आणि चेंडूची उसळी समजून घेतली तर त्यांना चांगली फलंदाजी करता येईल, तर गोलंदाजांनी योग्य टप्प्यांवर चेंडू टाकायला हवा,’’ असे सचिन म्हणाला.
सचिनने १९९२ ते २०११पर्यंत सहा विश्वचषकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्तंभलेखनामध्ये सचिनने काही कानमंत्र दिले आहेत.
‘‘न्यूझीलंडमध्ये खेळताना फलंदाजांना येथील हवेशीर वातावरणाचा अभ्यास करायला हवा. कारण हवेचा फलंदाजीवर फार मोठा परिणाम होतो. हवेच्या विरुद्ध खेळताना चेंडूने वेगाने येत असताना तुमच्या हालचाली मंदावत असतात. पण हवेच्या दिशेने फलंदाजी करताना चेंडू उशिराने येत असतो, तर फलंदाजाची हालचाल लवकर होत असते. या दोन्ही गोष्टींचा चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे,’’ असे सचिनने सांगितले.
मैदानांच्या अभ्यासाबद्दल सचिन म्हणाला की, ‘‘प्रत्येक मैदानाचा अभ्यासही खेळाडूंनी करायला हवा. न्यूझीलंडमधील मैदाने ही जास्त करून गोलाकार नाहीत. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल हे मैदानही गोलाकार नाही. या मैदानात पॉइंट आणि स्क्वेअर लेगवर सीमारेषा जवळ आहे, तर यष्टीसमोरची सीमारेषा लांब आहे. त्यामुळे जर मैदानांचा चांगला अभ्यास असेल तर कमी ताकद लगावून जास्त धावा मिळू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजांनाही त्यानुसार गोलंदाजी करता येऊ शकेल.’’
विश्वविजयाचा क्षण अनमोल -सचिन
पर्थ : विश्वचषक जिंकल्यावर जेव्हा मी मैदानात गेलो, तेव्हा मला अश्रू अनावर होत होते, माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, हा माझ्या कारकीर्दीतील असा एकमेव क्षण होता. माझ्या डोळ्यांतून आनंदामुळे अश्रूंना वाट मोकळी झाली होती, हे सारे आनंदाश्रू होते. हा क्षण माझ्यासाठी अनमोल असाच होता, कारण असे क्षण फक्त स्वप्नामध्येच मी अनुभवले होते.
प्रत्येक मैदानाचा अभ्यास करायला हवा
विश्वचषक काही तासांवर येऊन ठेपला असताना या स्पर्धेतील सर्वाधिक विक्रम असलेला भारताचा माजी महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळाडूंसाठी काही कानमंत्र दिले आहेत.
First published on: 12-02-2015 at 03:31 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar shares batting tips ahead of world cup