कसोटी आणि त्यानंतरच्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत विजयापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाने विश्वचषकाच्या महासोहळ्यात सलग सात सामने जिंकत सर्वानाच अचंबित केले. हे परिवर्तन घडवण्यात खेळाडूंची मेहनत निश्चितच आहे. मात्र त्यांच्या कच्च्या दुव्यांचे बलस्थानात रूपांतर करण्यासाठी खेळाडूंच्या बरोबरीने एक मोठी फौज कार्यरत आहे. त्यांचे प्रयत्न खेळाडूंच्या दिमाखदार कामगिरीत दिसत आहेत, मात्र ही मंडळी पडद्यामागे राहून संघाला विजयपथावर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघासोबत तब्बल १५ जणांचे सहयोगी पथकही राबते आहे. विश्वचषकासाठी आगमन झालेल्या कुठल्याही संघापेक्षा भारताच्या न खेळणाऱ्या साहाय्यकांची संख्या सर्वाधिक आहे. भारतीय संघ जगज्जेतेपदापासून दोन विजयांच्या अंतरावर आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्यास या मंडळींच्या प्रयत्नांना कोंदण लाभणार आहे. याच पडद्यामागील शिलेदारांचा घेतलेला वेध-
१. रवी शास्त्री – संचालक
तांत्रिक अडचणींचा गुंता सोडवण्यापेक्षा वडीलकीच्या नात्याने खेळाडूंशी त्यांच्या भाषेत सहज संवाद साधणारी व्यक्ती ही शास्त्रींची भूमिका आहे.
२. डंकन फ्लेचर – मुख्य प्रशिक्षक
संघाचे डावपेच आणि प्रतिस्पध्र्याचा अभ्यास करण्यात निष्णात.
३. संजय बांगर – फलंदाजीचे प्रशिक्षक
थंड डोके तसेच शांत व संयमी स्वभावाचे बांगर संघातील फलंदाजांना मदत करतात. सातत्याने आक्रमण करायचे असल्याने प्रतिस्पर्धी गोलंदाज फलंदाजांचा सखोल अभ्यास करतात. फलंदाजी भारतीय संघाचा कणा आहे आणि हा कणा ताठ राहावा, यासाठी बांगर यांचे प्रयत्न सुरू असतात. उसळत्या चेंडूचा सामना करताना रैनाला येणारी अडचण, शिखर धवनचे पदलालित्य, रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्यातून बांगर यांनी मार्ग काढला आहे.
४. भरत अरुण – गोलंदाजी प्रशिक्षक
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजांवर जोरदार टीका झाली होती. गोलंदाजांना त्या मन:स्थितीतून बाहेर काढत विश्वचषकासाठी सज्ज करण्याचे काम केले आहे अरुण यांनी. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूचा खुबीने उपयोग केला आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूची शैली हेरून त्यानुसार गोलंदाजी करण्यावर गोलंदाजांनी भर दिल्यानेच भारतीय संघाने सलग सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळण्याची किमया साधली आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्याबरोबरीने भरत अरुण आपले काम नेटाने करत आहेत. म्हणूनच एरवी टीकेचे केंद्र असलेले गोलंदाज सध्या वाहवा मिळवत आहेत.
५. आर. श्रीधर – क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
ढिसाळ क्षेत्ररक्षणासाठी भारतीय क्षेत्ररक्षकांची थट्टा उडवली जात असे. मात्र आता सगळ्यात चपळ क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणून भारतीय संघाने नाव कमावले आहे. २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखालील संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकावर कब्जा केला होता. ही मोहीम फत्ते करण्यात श्रीधर यांचा मोलाचा वाटा होता. एकेरी-दुहेरी धावांचा रतीब रोखणे, अचूक धावफेकीसह धावचीत करणे, प्रत्येक झेल टिपत प्रतिस्पध्र्यावर दडपण वाढवणे, चौकार रोखण्यासाठी दोन खेळाडूंनी मिळून प्रयत्न करणे हे सर्व श्रीधर यांचे भारतीय संघाला दिलेले योगदान. विश्वचषकात भारताने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेवर खळबळजनक विजय मिळवला होता. या विजयात भारताच्या क्षेत्ररक्षणाची विशेषत: दोन धावचीतचे योगदान निर्णायक होते.
६. नितीन पटेल – फिजिओथेरपिस्ट
खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यात फिजिओथेरपिस्ट पटेल यांचा वाटा महत्त्वाचा आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंना सज्ज करण्याचे काम पटेल करतात.
७. संदीप आनंद- व्हिडिओ अ‍ॅनालिस्ट
सर्व सामन्यांचे चित्रीकरण उपलब्ध असल्याने त्याद्वारे प्रतिस्पध्र्याचे कच्चे दुवे हेरता येतात. हे हेरण्याचे काम व्हिडीओ अ‍ॅनालिस्ट आनंद करतात.
८. व्ही.पी. सुदर्शन – मेंटल कंडिशनर
मैदानावर रंगणाऱ्या खेळापेक्षा क्रिकेट आता मनाधर्याचा खेळ झाला आहे. खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा कणखर करण्याचे काम सुदर्शन यांच्याकडे आहे.
९. रमेश माने – मसाजर
मुंबईकर ‘मानेकाका’ अर्थात रमेश माने थकल्या-भागलेल्या शरीराला मसाजचे काम करतात.
१०. अमित शाह – योगशिक्षक
योगा शिकवण्याची जबाबदारी आहे शाह यांच्याकडे.
११. रघू श्रीनिवासन – ट्रेनर  
रघू श्रीनिवासन ट्रेनर म्हणून काम पाहतात.
१२. एम. सतीश – लॉजिस्टिक मॅनेजर
एवढय़ा मोठय़ा प्रदीर्घ दौऱ्यात खेळाडूंचे कपडे, साहित्य, असे सगळे मिळून प्रचंड सामान होते. हा अवाढव्य पसारा सांभाळतात सतीश.
१३. डॉ. आर.एन. बाबा – मीडिया मॅनेजर
भारतीय संघाच्या पत्रकारपरिषदा, मुलाखती आदींचे नियोजन बाबा करतात.
१४. अर्षद अयुब – संघ व्यवस्थापक
संघाचा प्रवास, निवास आणि अन्य तांत्रिक गोष्टींचे व्यवस्थापन अयुब करतात.
१५. डग लायन्स – सुरक्षा व्यवस्थापक
भारतीय संघाचे चाहते जगभर पसरलेले आहेत. प्रत्येक खेळाडूचे स्वतंत्र चाहते वेगळेच. भारतीय संघाच्या सराव सत्रालाही प्रचंड उपस्थिती असते. हे प्रेम काही वेळा अतीही होते, तर काही वेळा नाराजीचा उद्रेकही होतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंची सुरक्षा कळीचा मुद्दा आहे. लायन्स हे संघाचे सुरक्षाकवच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा