श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमाने आणि कुमार संगकाराच्या बेधुंद फटकेबाजीच्या लहरींचा तडाखा रविवारी इंग्लिश संघाला बसला. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट तिसऱ्या पराभवाला सामोरा गेलेल्या इंग्लंडच्या संघाला आव्हान टिकवणे आता मुश्कील जाणार आहे. थिरिमाने आणि संगकाराच्या नाबाद शतकांच्या बळावर श्रीलंकेने नऊ विकेट राखून सहज विजय मिळवला.
वेस्टपॅक स्टेडियमवर इंग्लंडचे ३०९ धावांचे आव्हान पेलताना थिरिमाने याने (नाबाद १३९) दिलशान wc05तिलकरत्नेच्या (४४) साथीने शतकी सलामी नोंदवली. मग संगकारा(नाबाद ११७)सोबत दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची दमदार भागीदारी रचली. त्यामुळेच इंग्लंडचे लक्ष्य ४७.२ षटकांत श्रीलंकेला पार करता आले.
२५ वर्षीय थिरिमानेला चौथ्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. त्या वेळी तो ३ धावांवर होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने चौखूर फटकेबाजी करीत श्रीलंकेचा विश्वचषकातील सर्वात युवा शतकवीर होण्याचा मान मिळवला. त्याने १४३ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांसह आपली खेळी साकारली. उत्तुंग षटकारानिशीच त्याने श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संगकाराने आपल्या दर्जाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करीत २३वे शतक झळकावले. त्याने ८६ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह आपली खेळी फुलवली. याचप्रमाणे हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले.
इंग्लंडने रुटच्या शतकाच्या बळावर ५० षटकांत ६ बाद ३०९ धावा केल्या. रुटने १०८ चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांनिशी १२१ धावा केल्या. याचप्रमाणे जोस बटलरने १९ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत ६ बाद ३०९ (इयान बेल ४९, जो रुट १२१, जोस बटलर नाबाद ३९; तिलकरत्ने दिलशान १/३५) पराभूत वि. श्रीलंका : ४७.२ षटकांत १/३१२ (लाहिरू थिरिमाने
नाबाद १३९, कुमार संगकारा
नाबाद ११७; मोईन अली १/५०)
सामनावीर : कुमार संगकारा.

कुमार संगकारा हा अव्वल दर्जाचा खेळाडू आह़े  त्याने बहारदार फलंदाजी केली़  त्याची हीच खेळी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली़  
– लाहिरू थिरिमाने, श्रीलंकेचा फलंदाज

आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवल़े, मात्र गोलंदाजीत आम्ही अपयशी ठरलो, त्याचा भरुदड सोसावा लागला़
– इयॉन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

लाहिरू थिरिमाने
१३९*
चेंडू १४३
चौकार १३
षटकार २

कुमार संगकारा
११७*
चेंडू ८६
चौकार ११
षटकार २

दोनपेक्षा कमी फलंदाज गमावून तीनशेहून अधिक धावांच्या यशस्वी पाठलागाची दुसरी वेऴ  २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाचे ३६० धावांचे आव्हान भारताने एक फलंदाज गमावून पार केले होत़े
२१२ लाहिरू थिरिमाने व कुमार संगकारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली़  ही श्रीलंकेची विश्वचषकातील दुसऱ्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी. विश्वचषकात सलग दोन सामन्यांत द्विशतकी भागीदारी करणाऱ्या या जोडीने बांगलादेशविरुद्ध २१० धावांची भागीदारी केली होती़

लकमलला दंड
इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला दोन बिमर टाकूनही खेद व्यक्त न करणाऱ्या श्रीलंकन गोलंदाज सुरंगा लकमल याला आयसीसीने दंड ठोठावला आह़े  इंग्लंडविरुद्धच्या ५०व्या आणि अखेरच्या षटकात लकमलने पंच रॉड टकर यांच्या ताकीदीनंतरही सलग दोन बिमर टाकल़े  लकमलची गोलंदाजी अयोग्य असल्याचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी नमूद केले.

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका ) : २६८ धावा
२. ख्रिस गेल  (वेस्ट इंडिज) २५८ धावा
३. लाहिरू थिरिमाने (श्रीलंका) २५६ धावा

अव्वल गोलंदाज
१. टीम साऊदी (न्यूझीलंड) १३ बळी
२. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)   १० बळी
३. इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका) ९ बळी

Story img Loader