दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर भारताच्या प्रमुख फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळणे आवश्यक असल्याचे मत भारताचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार कपिल देवने व्यक्त केले.
‘‘सुरुवातीची १५ षटके विकेट न गमावता खेळून काढणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न करता येतील. सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करणे अत्यावश्यक आहे. पहिल्या पाच किंवा प्रमुख फलंदाजांनी निर्धाराने खेळणे आवश्यक आहे; अन्यथा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळू शकते. एखाद्या फलंदाजांने ४० षटकांच्या आत शतक झळकावले तर त्यानेच सूत्रधाराची भूमिका निभावत सर्व षटके खेळून काढायची आवश्यकता आहे.’’
गोलंदाजांविषयी विचारले असता कपिल म्हणाला, ‘‘गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे अत्यावश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर खेळण्याची सवय आहे. त्यांना बाद करण्यासाठी चेंडू स्विंग करणे गरजेचे आहे.’’
दक्षिण आफ्रिकेचा संघ संतुलित आहे. मात्र अनेकदा त्यांना नशिबाने दगा दिला आहे. विश्वचषकात त्यांनी आपल्याविरुद्धच्या तिन्ही लढतीत विजय मिळवला आहे. यंदा हशिम अमला, ए बी डी’व्हिलियर्स आणि डेल स्टेनसारखे खेळाडू असल्याने ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा