‘‘तिरंगी मालिकेतील पराभवानंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या भारतीय संघाने विश्वचषक स्पध्रेत आतापर्यंत क्षमतेनुसार कामगिरी केली आह़े  मात्र विश्वचषकाआधी झालेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा म्हणजे ‘वेळेचा आणि शक्तीचा दुरुपयोग’ होता,’’ असे ठाम मत संघ संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केल़े
कसोटी मालिकेतील पराभव आणि इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या तिरंगी स्पध्रेत झालेली निराशाजनक कामगिरी, हे वाईट अनुभव घेऊन भारतीय संघ चार वर्षांनंतर येणाऱ्या या महासंग्रामात दाखल झाला़  ‘‘माझ्या मते संघ मानसिकदृष्टय़ा थकला होता आणि त्यातून बाहेर पडत विश्वचषकासाठी खेळाडूंना ऊर्जेची आवश्यकता होती़  स्पध्रेपूर्वी घेतलेल्या विश्रांतीमुळे ते करणे शक्य झाल़े  ऐन मोक्याच्या क्षणी सर्व खेळाडू फॉर्मात आल़े  मनापासून सांगायचे झाल्यास ती तिरंगी स्पर्धा वेळेचा आणि शक्तीचा दुरुपयोग करणारी होती,’’ अशा शब्दांत शास्त्री यांनी पुनरुच्चार केला़
विश्वचषकातील भारताच्या कामगिरीचे शास्त्री यांना आश्चर्य वाटले नाही़  भारताने तगडय़ा दक्षिण आफ्रिकेसह पाकिस्तान व यूएईला नमवून विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली आह़े  विराट कोहलीच्या कामगिरीबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘‘सचिन तेंडुलकर आणि व्ही़ व्ही़ एस. लक्ष्मण यांचा अपवादवगळता ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर विराट कोहलीसारखा फटकेबाजी करणारा भारतीय खेळाडू पाहिलेला नाही़  चार कसोटी सामन्यांत चार शतके झळकावणारा एक भारतीय फलंदाज तुम्ही मला दाखवा़  तो अभूतपूर्व आह़े  तो आक्रमक आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देऊ शकलो़ ’’
गेल्या ऑगस्ट महिन्यात संघ संचालक म्हणूान नियुक्ती झालेल्या शास्त्री यांना मोहित शर्मा याने प्रभावित केले आहे. ते म्हणाले, ‘‘इतर गोलंदाजांपेक्षा मोहितच्या कामगिरीने मला प्रभावित केले आहे. इंग्लंडमध्ये त्याला पहिल्यांदा पाहिले आणि त्याला जी काही संधी मिळाली त्यात त्याने छाप पाडली़  मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्याची त्याची तयारी असत़े  विशेष म्हणजे तिन्ही गोलंदाजांचा अभिमान वाटतो़  ते तिघेही १४०च्या वेगाने मारा करत आहेत़ ’’

भारताच्या कामगिरीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही़  संघाने दमदार सुरुवात केली असताना आश्चर्य वाटण्याची गरजच नाही़  खेळाडूंवर आणि त्यांच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आह़े  क्षमतेनुसार खेळ करण्याची गरज होती आणि दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानविरुद्ध तसेच घडल़े