पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत संयमी शतकी खेळीनंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षांव होत आहे. या पंक्तीमध्ये वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकेल होल्डिंग यांचाही समावेश आहे.
‘‘चांगल्या सुरुवातीचे शतकात रूपांतर ही कोहलीची ताकद आहे. एकदा त्याने धावा जमवायला सुरुवात केली की तो शतक करूनच थांबतो. प्रत्येक दर्जेदार फलंदाजाकडून हीच अपेक्षा असते. १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने २२ शतके झळकावली आहेत. अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याचे कोहलीचे प्रमाण ६.५ इतके प्रभावी आहे. फलंदाज म्हणून कौशल्याला त्याने न्याय दिला आहे,’’ अशा शब्दांत होल्डिंग यांनी कोहलीची प्रशंसा केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांना शतक करण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र सलामीसह चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूंना ही संधी मिळते. कोहली या संधीचे सोने करतो.’’
भारताच्या गोलंदाजीविषयी विचारले असता होल्डिंग म्हणाले, ‘‘मोहम्मद शमीने सुरेख गोलंदाजी केली. उमेशने चांगल्या वेगाने गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला तरच विकेट्स मिळतात. महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांचा चतुराईने उपयोग केला.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा