त्याचे व्यक्तिमत्त्व सहज लक्ष वेधते, पण ते महत्त्वाचे नाही. कर्तृत्व महत्त्वाचे. तसा तो परफेक्शनिस्टच म्हणावा लागेल. सर्व जण ज्या ठिकाणी हात टेकतात, तिथे हा ‘फिटे लगान’ म्हणत पुढे सरसावतो आणि संपूर्ण कमान आपल्या मजबूत खांद्यावर उचलून धरतो. हा आमिर खान नव्हे, तर भारतीय क्रिकेट टीममध्ये सचिननंतरचा सर्वात आश्वासक चेहरा बनलेला विराट कोहली आहे. एका अर्थी विराट हा भारतीय क्रिकेट टीममधला आमिर खान आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
बघा ना, वर्ल्ड कप २०१५च्या धुमाळीत शिरण्यापूर्वी भारतीय टीमची अवस्था वस्त्रहरण झाल्यासारखीच झाली होती. कधी नव्हे, ते भारतीय क्रिकेट फॅन्सना वर्ल्ड कपविषयी उत्सुकता वाटत नव्हती. या वेळी आपली टीम वर्ल्ड कपच्या मदानात मानहानीकारक पराभव पत्करणार असेच फॅन्सना वाटत होते. विराटची तळपती बॅट ‘पीके’च्या ट्रान्झिस्टरचे काम करून गेली.. आणि यामुळेच ‘पीके’ने बॉक्स ऑफिसवर जो पब्लिक पॅक टीआरपी दिला, तसाच टीआरपी भारत-पाकिस्तान मॅचने मिळवला आहे. या मॅचनंतर वर्ल्ड कपचे वातावरण चांगलेच तापले आहे. आमिर खान ‘पीके’ तर विराट कोहली ‘व्हीके’ आहे. दोघांकडेही अनुष्का शर्मा आहे, हा अगदीच ‘क्लिशे’ आहे. ‘पीके’ने काही जणांच्या धार्मिक भावना दुखावल्या तर सामनावीर ‘व्हीके’मुळे निराश झालेल्या पाकिस्तानच्या काही संतप्त चाहत्यांनी टीव्ही सेट फोडले. आता वर्ल्ड कपमध्ये भारताला सातत्याने हरवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेबरोबर पुढची मोहीम आहे. दक्षिण आफ्रिका हरली तर पाकिस्तानप्रमाणे त्यांचे फॅन टीव्ही फोडण्याचा भावनिक उद्रेक करणार नाहीत, पण या लढाईत आपण जिंकलो तर भारतीय फॅन टीव्ही सेटलाच हार घालतील हे नक्की!
या ‘व्हिके’ला समस्त चाहत्यांच्या वतीने एकदा विचारायलाच हवे की, ‘‘आजवर विश्वचषक स्पध्रेत एकही फलदांज द्विशतक मारू शकलेला नाही. गॅरी कर्स्टनने केलेला १८८ धावांचा रेकॉर्ड खुणावतोय का तुला? एकाच विश्वचषक स्पध्रेत तीन शतके ठोकण्याची किमया आत्तापर्यंत केवळ तीनच फलंदाजांना साधता आली आहे. चार शतके मारून इथेही ‘अव्वल नंबरी’ होण्याचा रेकॉर्ड तुला करता येईल. रेकॉर्डचा विषय येतो तेव्हा तुला पाणी सुटते. एवढा तू स्वार्थी नक्कीच आहेस आणि तुझ्या स्वार्थातच भारतीय फॅन्सना वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न दिसते!’’
पाकिस्तानबरोबरच्या मॅचमध्ये शिखर धवनबरोबर जे ‘व्हिके’ने केले, त्यामुळे त्याची ‘बॅड बॉय’ची इमेज जपली आणि जोपर्यंत भारत विजयी होतोय तोपर्यंत याविषयी कुणाचीही तक्रार नसेल. ‘ऑल इज वेल’ म्हणत क्रिकेटरसिक प्रत्येक मॅच पाहतील!
अनुष्का, प्रेक्षकांत बसली की विराट आऊट होतो, ही केवळ बकवास आहे. उलट तिच्या उपस्थितीत विराट समोरच्या टीमची पळता भुई थोडी करतो, याचे उदाहरणही ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाहिले आहे.
पाकिस्तानला रडवल्यानंतर आता विराटवरच सारी मदार आहे, असे कुणी तरी विराटला म्हणाले. त्याला उत्तर देताना विराट म्हणाला होता की, ‘‘मला दडपण आणि अपेक्षा नेहमीच आवडतात.’’
भारताच्या प्रत्येक मॅचमध्ये मदानात विराट आणि प्रेक्षकांत अनुष्का. शतकी खेळी केल्यानंतर बॅट आडवी धरत ‘व्हिके’ने तिच्याकडे किसची फुंकर मारावी, असे क्षण या विश्वचषकात वारंवार यावेत, हीच प्रार्थना भारतीय क्रिकेटरसिकांनी केली होती. परंतु बीसीसीआयने खोडा घातला. विश्वचषक जिंकण्याची कामना पूर्ण व्हावी, म्हणून पत्नी आणि गर्लफेण्ड्सना दूर ठेवण्याचा फतवा काढला. त्यामुळे ‘व्हिके तिथे आणि अनुष्का इथे’ आहे. पण विश्वचषक गाजवून जेव्हा ‘व्हिके’ येईल, तेव्हा एअरपोर्टला स्वागताला अनुष्का पहिल्या रांगेत असेल. तूर्तास, अनुष्का फॅन्समध्ये आहे, अशी समजूत करून ‘व्हिके’ चुंबनाची फुंकर घालू शकतो. प्रेमात ताकद असते, विराटच्या प्रेमभावना काही समुद्र पार करीत भारतात नक्की पोहोचतील. २२वे शतक ठोकल्यावर कॅमेऱ्यावर ‘बिलिव्ह’ असे लिहून ‘व्हिके’ने स्वाक्षरी केलेला सेल्फी काढला. ‘व्हिके’वर समस्त भारतीय क्रिकेटरसिकांचा विश्वास आहेच, तो वृिद्धगत व्हावा, हीच अनुष्का! सॉरी .. अपेक्षा!!!
व्ही के
त्याचे व्यक्तिमत्त्व सहज लक्ष वेधते, पण ते महत्त्वाचे नाही. कर्तृत्व महत्त्वाचे. तसा तो परफेक्शनिस्टच म्हणावा लागेल. सर्व जण ज्या ठिकाणी हात टेकतात, तिथे हा ‘फिटे लगान’ म्हणत पुढे सरसावतो आणि संपूर्ण कमान आपल्या मजबूत खांद्यावर उचलून धरतो.
![व्ही के](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/02/wc0952.jpg?w=1024)
First published on: 20-02-2015 at 12:54 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vk virat kohli