powerटीकाकारांच्या जिभेला हाड नसते, असे म्हणतात. त्यांच्यालेखी पूर्वकामगिरी कितीही देदीप्यमान असली तरी ती इतिहासजमा होत असते, पण त्यांच्यामुळेच चांगली कामगिरी करण्याची ईर्षांही निर्माण होते, हे विसरून चालणार नाही. रोहित शर्माच्या बाबतीत असेच काहीसे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. पहिल्या सहा सामन्यांमध्ये त्याला छाप पाडता आली नव्हती. रोहितला आता विश्रांती द्या, अशी जिव्हारी लागणारी टीका होत होती. पण त्या टीकेला रोहितने आपल्या खेळीने तोडीस तोड उत्तर दिले. त्याच्या या खेळीने तो नायक झाला. याचप्रमाणे सुरेश रैनाची खेळी आणि गोलंदाजांची कामगिरी चोख झाली. पुन्हा एकदा भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर सोपा विजय मिळवला. पण या विजयी कामगिरीमध्येही सुधारणा हवीच.
सावध सुरुवात
प्रथम फलंदाजी करताना धावांची गती वाढवता आली नाही तरी चालेल, पण पहिल्या १५ षटकांमध्ये एकही बळी गमवायचा नाही, ही रणनीती भारतीय सलामीवीरांनी चोख बजावली. पण बांगलादेशसमोर खेळताना भारताला ३५०-४०० अशी मोठी धावसंख्या उभारता आली असती, पण ते भारतीय संघाला जमले नाही.
७५ धावांत तीन फलंदाज गमावले
धवन स्थिरस्थावर झाल्यावर मोठी खेळी साकारतो, पण सुरुवातीला संयतपणे खेळणारा धवन मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. कोहलीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूवर तो सुरुवातीच्या काळात बाद होऊ शकतो, हे पुन्हा एकदा दिसून आले. अजिंक्य स्थिरस्थावर झाला, मात्र त्याचा फटका मात्र चुकला आणि भारताने ७५-११५ धावांमध्ये तीन फलंदाज गमावले. बांगलादेशसाठी भारताला झटपट गुंडाळण्याची ही सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती गमावली.
रैनाचा धक्का
अडखळणाऱ्या भारताच्या गाडीला या वेळी रैनाने सुरेख धक्का दिला. एकेरी-दुहेरी धावा जमवत मध्येच मोठे फटके मारत त्याने भारताची गाडी रुळावर आणली. त्याच्या या फटकेबाजीमुळे रोहितचाही आत्मविश्वास वाढला. ३० षटकांमध्ये भारताची ३ बाद १२६ अशी अवस्था होती. पण या भागीदारीमुळे भारताने अखेरच्या २० षटकांमध्ये १७६ धावा फटकावत संघाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. तिसऱ्या पॉवर प्लेपासून या दोघांनी भारताची धावगती यशस्वीरीत्या वाढली.
रोहितला सूर गवसला
तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर परिस्थितीनुसार तुम्हाला खेळात बदल करावे लागतात, तेच रोहितने केले आणि त्यामुळेच त्याची ही खेळी परिपूर्णतेच्या जवळ जाणारी होती. कारण ९० धावांवर असताना त्याने मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली होती, कारण पंचांनी तो चेंडू ‘नो-बॉल’ ठरवल्याने तो सुदैवी ठरला. पण त्यानंतर रोहित शिताफीने सावरला. धवनबरोबर सलामीला आल्यावर त्याने चांगले आणि ठाशीव फटके लगावले. पण तीन फलंदाज बाद झाल़े, तेव्हा त्याने नांगरधारी फलंदाजांची भूमिका बजावली आणि धावा जमवल्या. मग स्थिरस्थावर झाल्यावर त्याने आपल्या पोतडीतील लाजवाब फटके बाहेर काढले. खासकरून शतक झळकावल्यावर त्याचे फटके बेमालूमपणे सीमारेषेवर जात होते, त्याच्या फलंदाजीतली सहजता ही डोळ्यांची पारणे फेडणारी होती. आता शतक झळकावल्यावर त्याने सातत्यपूर्ण फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे.
हुसेनचा फुगा फुटला
रुबेल हुसेन हा बांगलादेशचा अव्वल गोलंदाज. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ६ षटकांत फक्त १४ धावा देत एक बळी मिळवला होता. पण यानंतरच्या चार षटकांमध्ये भारताने तब्बल ४३ धावा वसूल केल्या. याशिवाय बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा गचाळ क्षेत्ररक्षण आणि वेळखाऊ गोलंदाजीमुळे चांगलाच संतप्त झाला होता. यामध्ये षटकादरम्यान क्षेत्ररक्षण बदलणाऱ्या युवा तस्किन अहमदला अद्वातद्वा बोलताना त्याचा तोल सुटल्याचे पाहायला मिळाले.
अचूक मारा
भारताचे गोलंदाज सध्याच्या घडीला दर्जेदार कामगिरीचा नजराणा पेश करत आहेत. एक गोलंदाज चालला नाही तर दुसरा यशस्वी ठरतो. सलग सातव्या सामन्यामध्ये आपण प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करणे, हे अद्वितीय आहे. सुरुवातीला शमीला चांगला मारा करता आला नाही, तेव्हा उमेश यादवने बळी मिळवले, शमीने दुसऱ्या स्पेलमध्ये भेदक मारा करत कसर भरून काढली. मोहित शर्माने अचूक मारा करत फलंदाजांना तंगवले. आर. अश्विनला एकही बळी मिळाला नसला तरी त्याने धावा रोखत बांगलादेशवर दडपण वाढवले. रवींद्र जडेजाला दोन बळी मिळवले खरे, पण त्याच्या गोलंदाजीमध्ये अश्विनसारखी चमक दिसली नाही. भारताच्या क्षेत्ररक्षकांनीही दमदार कामगिरी करत गोलंदाजांना मदतीचा हात दिला.
भारताला जे हवे होते ते या सामन्यात गवसले, ते म्हणजे रोहितचा फॉर्म. पण रोहित फॉर्मात आला असला तरी कोहली, अजिंक्य यांच्या कामगिरीमध्ये घसरण होताना दिसत आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करत असले तरी पाकिस्तान आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांत त्यांनी जो पहिल्या दहा षटकांमध्ये मारा केला होता, तो आता हरवला आहे. एकंदरीत सुधारणेला वाव आहेच. कारण आता उपांत्य फेरीत रात्र वैऱ्याची ठरू शकते.

Story img Loader