अंग झटकून अंतिम परीक्षेस wclogoभारत तय्यार होतोय, तो पूर्वपरीक्षेतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर. विश्वचषकातील १४ संघ, आपापल्या गटांत सहा-सहा सामने खेळले. त्या सर्वात भारतीय कामगिरी बिनतोड आहे, त्या झकास सुरुवातीबद्दल कप्तान महेंद्रसिंग धोनी, त्याचे सारे सहकारी, राखीव खेळाडू व मदतनीसांचा ताफा या सर्वाचं अभिनंदन. एरवी जवळजवळ निर्भेळ अशा या यशात, चिंतेची बाब म्हणजे रवींद्र जडेजाचा निराशाजनक खेळ आणि त्याखालोखाल रोहित शर्माची अडखळती वाटचाल.
पूर्वपरीक्षेतील कामगिरीची काही नेत्रदीपक वैशिष्टय़ं. (आकडेवारीच्या आधारे)
१. सहाही सामन्यांत प्रतिपक्षाचा संपूर्ण संघ, दहाच्या दहा खेळाडू तंबूत परत पाठवणारा एकमेव संघ भारतच. स्टार्क व जॉन्सन यांचा ऑस्ट्रेलियन संघ; स्टेन, मॉर्ने मॉर्केल, फिलँडर व इम्रान ताहीर यांची दक्षिण आफ्रिका; तसेच बोल्ट, ट्रेंट व व्हिटोरी यांचे न्यूझीलंड. हे तिन्ही संघ गोलंदाजीत भारतापेक्षा भेदक, पण त्यांना न पेलवलेली ही गोष्ट घडवून आणली मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहित शर्मा, अश्विन व जडेजा या पंचकाने.
२. साधारणत: दर सामन्यात किमान तीन निर्धाव षटकांची सरासरी. पूर्वपरीक्षेत ‘ब’ गटातील इतर सहा स्पर्धक संघांपेक्षा थोडी जास्तच अशी १९ निर्धाव षटकं, म्हणजे पूर्वपरीक्षेत भारतीय गोलंदाज जसे सर्वात भेदक तसेच सर्वात अचूक व क्षेत्ररचनेस पूरक मारा करणारे.
३. त्यांनी षटकामागे दिल्या फक्त पावणेपाच धावा (काटेकोरपणे ४.७२ धावा). ‘ब’ गट साखळीत हीच सर्वोत्तम आकडेवारी.
४. तसेच एकेक फलंदाज बाद करण्यासाठी ‘ब’ गटात भारतानं मोजल्या सरासरी २०पेक्षा किंचित जास्त, २०.५२ धावा. ही कामगिरीही अव्वल. भारतीय फलंदाजीपेक्षा भारतीय गोलंदाजीची स्पध्रेआधी काळजी वाटत होती. पण पूर्वपरीक्षेत त्यांनी खेळ उंचावलाय!
श्रीलंकेपेक्षा सरस
५. फलंदाजी हे पुष्कळदा भारताचं बलस्थान. पूर्वपरीक्षेत भारतीय फलंदाजांची सरासरी ५३-४८ धावा ही १४ स्पर्धक संघांत सर्वोच्च. कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, मॅथ्यूज यांच्या अनुभवी श्रीलंकन फलंदाजीपेक्षाही (४८.६६ धावा) भारतीय सरस. एकेक बळी मिळवण्यासाठी प्रतिपक्षाला ५४ धावांची किंमत मोजावी लागलीय.
६. विश्वचषकाच्या साखळीतील सहा सामन्यांत केवळ २७ भारतीय फलंदाज बाद झाले. मग क्रमांक लागतो ब्रेंडन मॅक्क्युलमच्या न्यूझीलंडचा. त्यांना गमवावे लागले ३५, म्हणजे भारतापेक्षा आठ जास्त.
७. बाद झालेल्या या फलंदाजांत केवळ दोघांच्याच नावापुढे भोपळा. भोपळ्यांची सर्वात छोटी संख्याही भारताचीच.
८. जोडय़ा जमवणं, शतकी भागीदाऱ्या रचणं, हा डावाला आकार देणारा खेळ. श्रीलंकन फलंदाजांनी सात शतकी भागीदाऱ्या नोंदवल्या. भारताच्या खात्यात श्रीलंकेपेक्षा एक कमी, म्हणजे सहा शतकी भागीदाऱ्या. पण भारताविरुद्ध उभारली गेली एकुलती एक शतकी भागी, ती म्हणजे ब्रेंडन टेलर व एव्‍‌र्हीन या पाचव्या जोडीची (पाचव्या विकेटसाठी ८० चेंडूंत १०९ धावा).
९. क्षेत्ररक्षकांचीही भूमिका उत्तम. पूर्वपरीक्षेत ६० बळींमध्ये ४५ झेल. दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान (४१) यांपेक्षा भारतीय क्षेत्ररक्षकांनी टिपले चार जादा झेल. शिवाय प्रतिपक्षाच्या चौघांना धावचीत केलं, ते वेगळंच.
१०. धोनीचं यष्टीरक्षण पूर्वीपेक्षा सुधारलेलं. यष्टीरक्षणात तो आक्रमक व नीटनेटका नसला तरी कमी चुका करणारा मानला जातो. पूर्वपरीक्षेतील सहा सामन्यांत, म्हणजे जास्तीत जास्त ३०० षटकांत (प्रत्यक्षात २६९ षटकांत) त्यानं एकही बाय दिली नाही. एवढी अभेद्य भिंत उभारणारा एकमेव यष्टीरक्षक.
जडेजाचं करायचं काय?
ही सारी आकडेवारी पहिल्या व त्या मानानं सोप्या टप्प्यातील राजेशाही घोडदौडीची. पण या घोडदौडीला लगाम घालण्याचा खेळ घडला रवींद्र जडेजाच्या हातून, ती मात्र चिंतेची बाब. फलंदाज जडेजाचं अपयश, एक वेळ माफक. सहापैकी तीन सामन्यांत त्याच्यावर फलंदाजीची वेळच आली नव्हती. सलामीच्या लढतीत पाकविरुद्ध धोनीनं त्याला दिला रहाणेआधी सहावा क्रमांक. तो आला तेव्हा ४७.३ षटकं संपलेली होती. वेळ हातघाईची. तेव्हा त्याच्या धावा, ५चेंडूंत ३! मग दक्षिण आफ्रिकेसमोर तो आला तेव्हा ४६ षटकं पूर्ण. पुन्हा टोलेबाजीबाबत अपेक्षाभंग : ४ चेंडूंत २ धावांवर धावचीत. पण विंडीजशी, २३ षटकांत ५ बाद १०७ अशी भारतीय स्थिती. तेव्हा गरज २७ षटकांत ७८ धावांची. जडेजाकडून अपेक्षा धोनीला साथ देण्याची. उंच टोले चढवताना सावधगिरी बाळगण्याची. पण जडेजाकडून दगाफटका. २३ चेंडूंत १३. चेंडू उंच खेचण्याच्या बेजबाबदार, अनियंत्रित नशेत उंच झेल तेवढा दिलेला.
गोलंदाजीत त्यानं काय दिवे लावले? सहसदस्य वा लिंबू-टिंबू अशा संयुक्त अरब अमिरातीसमोर ५-०-२३-२. त्याचे बळी नवव्या-दहाव्या क्रमांकाचे फलंदाज! बऱ्या दर्जाच्या आर्यलडशी ७-०-४५-१. बळी मिळवला सातव्या क्रमांकाच्या विल्सनचा. कसोटी संघात तळाला असलेल्या झिम्बाब्वेकडून धुलाई १० षटकांत ७१! त्याला दिलासा, शमी-अश्विन यांनाही चार-चार षटकारांच्या चपराका!
प्रमुख कसोटी संघांचे कोणते चार फलंदाज जडेजाच्या सापळ्यात सापडले? दक्षिण आफ्रिकेचा ११वा फलंदाज ताहीर. विंडीजचे सातव्या-नवव्या क्रमांकावरचे अष्टपैलू आंद्रे रसेल व अर्धशतकवीर जेसन होल्डर. पूर्वपरीक्षेत त्यानं गारद केलेला एकमेव दर्जेदार फलंदाज म्हणजे पाकिस्तानचा उमर अकमल. या तीन सामन्यांत त्याच्या माऱ्याचा तपशील असा- पाक १०-०-५६-१. द. आफ्रिका ८.२-०-३७-१. अन् विंडीज ८.२-०-३७-२. तरीही कप्तान साब ‘माही’ला जडेजा हवाच आहे. त्यांना जोडणारे नाजूक धागे, श्रीनि-धोनी यांच्या सीएसकेचे. चेन्नई सुपर किंग्जचे.
सुनील-कपिल-सीएसके
सुनील गावस्कर राष्ट्रीय कर्णधार असताना आणि मुंबईकडे उत्तमोत्तम खेळाडूंचा दबदबा असताना, दादर युनियनच्या सुरू नाईकला १९८२च्या इंग्लंड दौऱ्यावर नेलं. त्याबद्दल सुनीलवर टीका झाली होती. सुनीलनं त्या दौऱ्यातील पूर्ण मालिकेत सुरूला सतत खेळवण्याचा हट्ट धरला नव्हता. १९८३च्या  विश्वचषकात संघनायक कपिल देवनं दिल्लीच्या डावखुऱ्या मध्यमगती सुनील वॉल्सनला घुसवलं खरं. पण आठ सामन्यांत कायम राखीव खेळाडू ठेवलं. तेव्हा टीका होत असे प्रांतीयतेची. भाषिक वादाची. आता सीएसके अमर्यादित अशी की दर सामन्यात अपेशी होत असूनही जडेजाचं स्थान अबाधित आहे. जडेजाचं करायचं तरी काय, हा प्रश्न तुम्हाला-आम्हाला भेडसावतो. श्रीनींचे धोनी यांना या प्रश्नाचं अस्तित्वच अमान्य दिसतंय. जडेजाचं करायचं तरी काय? आशा धरू या, कुणी सांगावं यापुढच्या साऱ्या सामन्यांत तो या खूप मोठय़ा अपयशाची भरपाई करील! सीएसके नक्की मग त्याची कदर करील!
वि. वि. करमरकर