विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७६ धावांनी नमवत सलग सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघाने उपकर्णधार विराट कोहलीचे शतक व सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत ३०० धावा फलकावर झळकावल्या. मात्र, भारताचे हे आव्हान पाकिस्तानी संघाला पेलवले नाही. २२४ धावांवर त्यांचा खेळ आटोपला आणि विश्वचषक स्पर्धेत सलग सहाव्यांदा पाकला नमवण्याचा विक्रम भारताने नोंदवला.

अ‍ॅडलेडवर वंदे मातरम्
भारतीयांनी परिधान केलेल्या निळ्या गणवेशामध्ये स्टेडियम न्हाऊन निघाले होते. एकीकडे भारतीय चाहत्यांच्या ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले असतानाच पाकिस्तानी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मात्र दु:ख दिसत होते. मिसबाह बाद झाल्यावर चाहत्यांनी स्टेडियममधून काढता पाय घेतला.

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक बाद झाला आणि तमाम मुंबईकरांनी जागोजागी ढोल-ताशे वाजवत आनंद साजरा केला तर अनेक ठिकाणी तिरंगा फडकावत विजयी मिरवणुकाही काढण्यात आल्या. प्रत्यक्ष सामना सुरू असताना रस्त्यांवर शुकशुकाट होता. सामना संपल्यावर हे चित्र मात्र पालटले.

भारतात जल्लोष, पाकमध्ये मातम
*सामन्यादरम्यान भारत व पाक या दोन्ही देशांमध्ये रस्त्यांवर स्मशानशांतता होती.
*निकालानंतर दोन्ही देशांतील चाहते रस्त्यांवर उतरले खरे, पण भारतात जल्लोष तर पाकिस्तानमध्ये तीव्र पडसाद.
*भारतामध्ये फटाके फोडत, मिष्टान्ने वाटत हा विजय राष्ट्रीय सणासारखा साजरा केला. तर पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांचा राग घरांतील दूरचित्रवाणीसंचांवर काढला.  

विराट कोहली
१०७ धावा
१२६ चेंडू
०८ चौकार