‘रसेल मी, असेन मी..’ हे बोल वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने सार्थ ठरवले. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे ख्राइस्टचर्च येथे कॅरेबियन संघाला शनिवारी विजयाचा राजमार्ग दिसला. दुसरीकडे पाकिस्तानी संघाची पराभवाची अंधारयात्रा अद्याप संपलेली नाही. भारताकडून पत्करलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरू न शकलेल्या पाकिस्तानी संघाचा विंडीज संघाने १५० धावांनी धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या पराभवामुळे आता पाकिस्तानी संघाला विश्वचषकातील आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित सामन्यांत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
हॅगले ओव्हलवर झालेल्या पूर्णत: एकतर्फी लढतीत रसेलने फक्त १३ चेंडूंत नाबाद ४२ धावांची खेळी साकारली. यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. याचप्रमाणे दिनेश रामदिन (५१) आणि लेंडल सिमन्स (५०) यांनी आपल्या अर्धशतकांचे योगदान दिले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने ६ बाद ३१० धावा उभाल्या.
त्यानंतर रसेलने ३३ धावांत ३ बळी घेण्याची किमया साधल्यामुळे विंडीजने पाकिस्तानचा डाव ३९ षटकांत १६० धावांत गुंडाळला.
गेल्या रविवारी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताकडून ७६ धावांनी पराभव पत्करला होता. दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानी संघ सर्वच विभागांमध्ये अपयशी ठरला. या दोन पराभवांमुळे सात संघांचा समावेश असलेल्या ब-गटातून बाद फेरी गाठणे आता पाकिस्तानसाठी कठीण झाले आहे.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या पाकिस्तानने सुरुवातीला विंडीजची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. परंतु त्यानंतर मात्र कॅरेबियन संघ सावरला आणि धावसंख्येचे त्रिशतक ओलांडले. अखेरच्या दहा षटकांत विंडीज संघाने ११५ धावा काढल्या. पाकिस्तानच्या संघाने तब्बल चार महत्त्वाचे झेल सोडले. मोहम्मद इरफान (१/४४) आणि शाहीद आफ्रिदी (०/४८) वगळता अन्य सर्व गोलंदाजांना विंडीजच्या फलंदाजांनी षटकाला सातपेक्षा अधिक धावांचा चोप दिला.
पाकिस्तानच्या आशा तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मावळल्या. धावफलकावर १ धाव झळकत असताना त्यांचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. फक्त उमर अकमल (५९), शोएब मकसूद (५०) आणि शाहीद आफ्रिदी (२८) यांनी विंडीजच्या फलंदाजीचा नेटाने सामना करीत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे बाकी आठही फलंदाज दोन आकडी धावासुद्धा करू शकले नाहीत.
विंडीजचा वेगवान गोलंदाज जेरॉम टेलरने १५ धावांत तीन बळी घेत पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीला हादरे दिले. डावखुरा फिरकी गोलंदाज सुलेमान बेनने दोन बळी घेतले. कर्णधार जेसन होल्डर आणि डॅरेन सॅमी यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा