राजचा पेपर आधी दरवाजाखालून सरपटत यायचा. आता तेवढा वेळ पेपर टाकणाऱ्या पोराकडे नसेल किंवा पेपरची जाडी वाढल्यामुळं दरवाजाखालून पेपर सरकवणं शक्य होत नसेल. म्हणून आताशा कुठली तरी नोटीस असल्यासारखा दरवाजाच्या कडीला पेपर लावलेला असतो. दरवाजाखालून सरपटत येवो वा दरवाजाला लावलेला असो, किंवा दगडफेकीसारखा दरवाजात भिरकावलेला असो. या आलेल्या पेपरमध्ये बेमालूमपणे जाहिरातींची पॅॅम्पलेट्स आलेली असतात. पेपरची घडी उघडली की हमखास एखादं पॅम्पलेट खाली टपकतं. कशाकशाच्या जाहिराती असतात. मोफत नेत्रतपासणीपासून ते दिव्यदृष्टी प्राप्तीपर्यंतच्या जाहिराती असतात. बाकी भव्य सेलमधले कपडे घालून आणि वेगवेगळ्या वस्तू सवलतीत विकत घेऊन आपली गेलेली शक्ती परत मिळणार असते. पेपरला लोचटपणे चिकटून येणाऱ्या अशा पॅम्पलेटकडे दुलक्ष करता येतं. पण आजकाल दररोज येणाऱ्या एका बातमीकडं दुर्लक्ष करता येईना. कदाचित आधी कधीतरी येणाऱ्या या बातमीकडं दुर्लक्ष केल्यामुळंच ही बातमी आता दररोज वाचावी लागतेय. एखाद्या मोठय़ा मॉलमध्ये हव्या त्या वस्तू-कपडे भरून असतात. तसा वेगवेगळ्या बातम्यांनी भरलेला पेपर भरून गेलेला असतो. या बातम्यांत, घासात येणाऱ्या खडय़ासारखी एक बातमी असतेच. बातमी असते शेतकऱ्याच्या आत्महत्येची.

आधी या बातम्या दूरच्या गावातल्या असायच्या. बातम्या वाचून मन सुन्न व्हायचं. टीव्हीवरच्या बातमीत ठरावीक दृश्यं असायची. शेत, शेतातलं झाड, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं घर. विमनस्क कुटुंबीय. कॅमेऱ्यासमोर कोरडय़ा नजरेनं बोलणारा आत्महत्या करणाऱ्याचा बाप, पोरगा, भाऊ कधी बायको कधी म्हातारी माय. नजरेत कोरडेपणा. बोलत असायचे, ‘‘सोसायटीचं कर्ज व्हतं. तीन सालापासून वावरात काही पिकलं नाही. या सालीबी पावसानं दगा दिला. म्हणून लईच खचले व्हते. व्हईल काही तरी म्हणून आम्ही समजावलं. बेचैनी होती. काल दुपारच्या टायमाला च्या पिला. वावरात जाऊन येतो म्हणले अन् असं करून बसले. आता आम्ही काय करावं.. लेकराला कसं जगवावं.. ’’ ओसाड गावातल्या घराच्या पाश्र्वभूमीवर घेतलेला ‘बाईट’ नित्याचा झालाय.

आधी महानगरातून- शहरातून आत्महत्या व्हायच्या. आजार, आर्थिक विवंचना, कौटुंबिक ताणतणाव तर कधी सासरच्या छळाला वैतागून आत्महत्या व्हायच्या. बरेचदा रॉकेल अंगावर टाकून पेटवून घेतलं जायचं. पण जास्त प्रमाणात पंख्याला लटकवून घ्यायचे. तेव्हापासून एखादी पंख्याची कंपनी आपल्या पंख्याची विचित्र जाहिरात करेल की काय अशी भीती वाटते. काय घ्या, पंख्याचा दणकटपणा सांगताना पंख्याला लटकून मरणाऱ्याचा दाखलाही देऊ शकतात. ओएलएक्सवर काहीही विकायला आणि विकत घ्यायला निघालेली आपण माणसं आहोत. हे आत्महत्येचं लोण पाहता-पाहता खेडय़ात आलं आणि ‘मढं झाकून पेरणी करणारा कुणबी’ या तुकारामाच्या वचनाला तडा गेला. पेरणारा कधी असा मरणारा होत नसतो. पण गावोगाव झाडाला प्रेतं झुंबरासारखे लोंबकळू लागले. ही कुठल्या उत्सवाची तयारी,
काही कळे ना.  हे सर्व वाचताना, ऐकताना टीव्हीवर पाहताना एक विचित्र दिवस उजाडला. दुर्बिणीतून लांबचा डोंगर जवळ दिसावा हे ठीक. पण त्या डोंगराचा चक्क नाकाला स्पर्श झाला तर घाबरून हातातली दुर्बीण खालीच पडणार ना. झालं तसंच. कॉलेजातून दुपारी घरी आलो. जेवण करून पेपर वाचत होतो. तेवढय़ात फोन खणखणला. फोनवर मित्र बोलत होता. भयंकर बातमी होती. वीसेक कि.मी अंतरावर एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली होती. बापरे, म्हणजे हा साथीचा रोग आमच्या गावाजवळ येऊन पोहचला होता. लांबवर घडणारी घटना आज अंगणापर्यंत आली होती. आत्महत्या करणारा शेतकरी कोण? त्याचं नाव काय काहीही माहीत नव्हतं.

पण अस्वस्थता शांत बसू देईना. शेवटी आम्ही मोटारसायकल काढली आणि त्या गावाच्या दिशेनं निघालो. छोटंसं गाव. मुख्य रस्त्यापासून दहा- बारा कि.मी आत. गिट्टी उखडलेला रस्ता. खुट्ट वाजलं तरी लोकांचे कान टवकारणारे. इथं तर मृत्यू अवतरलेला होता. तोही साधासुधा नाही. विषारी औषध गटागटा पिऊन शांत झालेला मृत्यू! वेशीवरच्या मारोतीजवळ पायऱ्यावर चार-पाच जण बसलेले. दबक्या आवाजात बोलत होते. अरुंद गल्ली. रस्त्यावरून नालीचं पाणी वाहतंय. पायऱ्यांवर, उंबऱ्यात, ओटय़ावर लोक बसलेले. लोकांच्या गर्दीमुळं आम्ही सहज घरासमोर येऊन पोहचलो. पुढं सरकणाऱ्या आमच्या मोटारसायकलबरोबर सगळ्यांच्या नजरा सरकत होत्या. गावाच्या शेवटाला घर. घर म्हणजे काय तर, विटानं रचलेल्या दोन पत्र्याच्या खोल्या. भिंतींना मातीनं लिंपून सारवलेलं. समोर मोठं सारवलेलं अंगण. अंगणात शेवग्याचं झाड. झाडाखाली जमिनीत अर्धा पुरलेला रांजण. रांजण शेवाळलेला. रांजणावर झाकण म्हणून ठेवलेला लाकडाचा तुटका पाट. पाटावर पालथा ठेवलेला पितळी तांब्या. शेजारी वाळकी तुळस. घराला पराटय़ाचं लावलेलं कुंपण. अंगणात बांधलेली शेळी. कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला एक कापलेल्या झाडाचं भलंमोठं खोड ठेवलेलं. त्या खोडावर लोक बसलेले. आजूबाजूला काही लोक उभे.

अंगणातल्या खाटेवर बसलाय तो बाप. शेतात जाऊन विषारी औषध पिणाऱ्या पोराचं वय ३० र्वष. पाच एकर शेती. पाऊसकाळ नाही. तीन वर्षांपासून नापिकी दुष्काळ. पंच्याहत्तर हजाराचं सावकाराकडून नवं कर्ज घ्यावं लागलं. पावसाळा कोरडा गेला. उगवलेलं वाळून गेलं. सकाळी पंचनामा झाल्यावर पत्र्याच्या खोलीत प्रेत आणून ठेवलंय. म्हातारी आई पदरानं माशा हाणतेय. बायको कोरडय़ा पडलेल्या डोळ्यानं प्रेताशेजारी बसून आहे. लेकरं अंगणात खेळतायत. आम्ही मरणदारी अंगणातल्या धोंडय़ावर बसलो. त्या घरातलं ओळखीचं कुणीच नाही. इथे येऊन असं का बसलो, काही कळेना.

‘ह्यो जुनाट मलखांब

वरून धडधाकट आतून पोगरला

या मलखांबाशी खेळून

सगळेच बलदंड झाले

दुबार-तिबार पेरणीच्या नावानं

घरावरचे पत्रे गेले

मालक,

नापिकी, कर्ज, दुस्काळ

हे तर जलमाचे सोयरे

परिस्थितीनं धोतर फेडून नंगं केलं

पण कर्ज नाय फेडता आलं

मंग शेतात जाऊन

यानं घटा घटा ‘एंड्रीन’ पेलं

लोक उगीच चवताळल्यावानी करतेत

म्हणले, याचा मुडदा

ग्रामपंचायतीतच जाळायचा

शेवटी अधिकाऱ्यानं समजावलं,

आपल्या सरकारच्या इज्जतीचा

सवाल हाय म्हणून लिडरायनं फटकारलं

अन् सकाळच्याला प्रेत घरी आणलं’

प्रेत ठेवलेल्या घराभोवती आम्ही सगळे जमलो होतो. काही जणांना आम्ही पत्रकार वाटलो. पण आम्ही काहीच नव्हतो. तरीही स्वत:ला संपवणाऱ्या त्या शेतकऱ्याचे आम्ही कोणीतरी लागत होतो. काहीच नसलो तरी शेवटी, सगळ्यासाठी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला जगणं असह्य करणाऱ्या कृषिप्रधान देशातील आम्ही नागरिक होतो. तेवढय़ात लोकांमध्ये हालचाल झाली. कुजबुज झाली. दोन-तीन गाडय़ा येऊन थांबल्या. आमदार साहेब आले होते. त्या उदास मळकट वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर साहेबांच्या कपडय़ांची शुभ्रता अधिकच उठून दिसत होती. साहेबांच्या श्वासाच्या लयीत हलणाराव कार्यकर्त्यांचा ताफा सोबत होता. ठेंगण्या दाराच्या चौकटीमुळं साहेबांना वाकावं लागलं. दु:खात असणारी देहबोली घेऊन साहेब आत गेले. अंत्यदर्शन घेऊन आले. खाटेवर बसलेल्या अभागी बापाचं सांत्वन केलं. मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. लोकांना हात जोडून नमस्कार करीत गाडीत बसले. गाडय़ा आल्या तशा निघून गेल्या. कुजबुज, चर्चा रंगात आली. साहेबांच्या काळ्याभोर चष्म्याआड आसू चमकलेला त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांला दिसला होता.

अंत्यविधी झाल्यावर तीन दिवसांनी साक्षात मंत्रीसाहेब आले. हेलिकॉप्टरच्या पंख्यानं गावं हादरलं. हेलिकॉप्टर बघायला गर्दी झाली. बाजूच्या गावातले लोकही आले होते. मंत्रीसाहेबांनी एक लाख रुपयाचा चेक म्हाताऱ्या बापाला दिला. फ्लॅश चमकले. फोटो निघाले. कृतकृतार्थ होऊन मंत्रीसाहेब निघाले. हेलिकॉप्टरचा पंखा सुरू झाला. जमीन हादरली. आवाजानं कानठळ्या बसल्या. मंत्रीसाहेब थांबले असते अजून थोडा वेळ, पण अजून दोन गावांत लाख लाख रुपयांची बक्षिसी वाटायची होती. किती तरी वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतायत. मायबाप सरकारही लाख-लाख रुपयांची बक्षिसी न थकता वाटतंय. तुम्ही आंब्याच्या झाडाला फास घ्या किंवा बाभळीच्या झाडाला लटकवून घ्या किंवा विषारी औषध गटागटा पिऊन मरा. सरकार भेदभाव करणार नाही. हां, सरकारी यंत्रणा थोडे नियम दाखवेल. थोडा त्रास होईल. पण लाख रुपयाची बक्षिसी मिळणार. लाख-लाख रुपयाची बक्षिसी वाटणारं सरकार पाठीशी असल्यामुळं शेतकरीही बिनघोरपणे आत्महत्या करतायत. भावनेच्या उद्रेकात किंवा बेसावध क्षणी नव्हे तर मायबाप सरकारला रीतसर पत्र लिहून तरुण सुशिक्षित शेतकरी स्वत:ला संपवतायत. या आत्महत्या आहेत का हत्या आहेत, व्यवस्थेनं घेतलेले बळी आहेत का अजून काही आहे यावर चर्चा सुरू आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखा हा जगण्या-मरण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय, म्हणून लेखक मंडळी निषेध म्हणून स्वत:ला मिळालेले पुरस्कार परत करतायत. पण शेतकऱ्यानं काय परत करावं? शेतकरी त्याला मिळालेली लाख रुपयाची बक्षिसी परत करू शकत नाही. कारण ही मदत मेल्यानंतर मिळते. आणि कुत्र्या-मांजरासारख्या त्याच्या मरणासाठी कुणी पुरस्कार परत केलेला नाही. लेखकांना दोन सरकारमध्ये ‘डावं-उजवं’ करता येतं. म्हणजे ‘ते’ कमी असहिष्णू, ‘हे’ जास्त असहिष्णू असा भेद करता येतो. पण शेतकऱ्यांना सगळे सरकार सारखे. सगळे पॅकेज सारखे.

‘किती रसिक असतं मरण

शोधतं नवनव्या तऱ्हा

मांडतं आरास.

सरकारही तेवढंच कदरदान

देतं लाख-लाख रुपयाची

बक्षिसी.’

खऱ्या अर्थानं मातीत राबणारा शेतकरी इथं पुरस्कृत झालाच नाही. वापस करण्यासाठी त्याच्याजवळ पुरस्कार नाहीत. म्हणून तो जगणंच परत करतोय, लटकलेल्या देहाच्या स्मृतिचिन्हासह.

– दासू वैद्य
dasoovaidya@gmail.com

Story img Loader