वनअभ्यासक, साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जंगलांमध्ये व्यतीत केली. वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने त्यांना जंगल आणि निसर्ग अत्यंत जवळून जाणून घेण्याची संधी लाभली. जंगलामधील या वास्तव्यातील सूक्ष्म निरीक्षणांतून वृक्षवल्ली आणि वन्यप्राणी तसेच पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अभ्यास करून त्यांनी अनुभवसिद्ध ग्रंथसंपदा प्रसवली आहे.
पावसाळ्यापूर्वी निसर्गसृष्टीत होणाऱ्या बदलांचे आश्चर्यकारक विश्व या अरण्यऋषीच्या शब्दांत..
तब्बल चार दशकांचा काळ मी जंगलात घालवला. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून अनुभवले. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या. जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे मी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल टिपता आले. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटलो, त्यांच्याबरोबर जंगलात राहिलो, त्यांचा विश्वास संपादन केला. पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हेदेखील पाहिले. परंतु अशी असंख्य निरीक्षणे मी स्वत:ही अनुभवली. टिपली. माझ्या पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो.
पावसाळ्यापूर्वी जंगलातील वातावरणातले अनोखे बदल मलादेखील सूक्ष्म निरीक्षणानंतरच जाणवले.. आकळले. पशुपक्ष्यांची अस्वस्थता, त्यांच्या हालचालींवरून येणाऱ्या पावसाच्या अंदाजाचे, तसंच दुष्काळाचे मिळणारे संकेत हे अत्यंत गूढ रहस्य आहे. या निरीक्षणांना आधुनिक संगणकयुगात अंधश्रद्धा म्हणून हिणवले जाऊ शकेल; परंतु निबीड अरण्यातील तसेच समुद्रकाठानजीकचे माझे अनुभव फार वेगळे आहेत. हवामान खात्यानेही या निरीक्षणांची नोंद घ्यावी एवढे ते महत्त्वाचे आहेत. पाऊस केव्हा येतो आणि केव्हा संपतो, हे आम्हाला सांगता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ म्हणतात. परंतु अरण्यातल्या पशुपक्ष्यांना त्याचे पूर्वसंकेत खूप आधीच मिळतात, हेही तेवढेच खरे.
साधारण दीड- दोन महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांना संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात. पक्षी प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशा हजारो पक्ष्यांची निरीक्षणे, टिपणे माझ्या संग्रही आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य उलगडले. अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत. नोकरीनिमित्ताने वर्षांनुवर्षे जंगलात राहिल्यामुळे मला त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी मिळू शकली.
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. जंगलातील वृक्षांची सळसळ सुरू होते. हवेचा जोर वाढतो. आकाशात ढग येण्याची चाहूल या पक्ष्यांना पूर्वीच मिळालेली असते. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे. चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत. आज विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी आजही तुम्ही ग्रामीण भागात जा, पावशाने दिलेल्या संकेतावरच       शेतक ऱ्यांकडून शेतीची नांगरणीची कामे सुरू केली जातात. हा पक्षी ‘पेरणी करा’ असे शेतकऱ्याला सुचवण्यासाठीच येत असतो. माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच  पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.
कावळ्यांची निरीक्षणे ही तर यापेक्षाही आश्चर्यकारक आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली स्निग्ध झाडे- आंबा, करंज तसेच काटेरी झाडे यांचा व कावळ्यांचा पूर्वापार संबंध आहे. हवामानातील बदल, पावसाचे संकेत आणि दुष्काळाची नांदी देणारे हे नैसर्गिक चक्र आहे. पण त्याचा अभ्यास या नव्या युगात कुणीही करीत नाही. कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळा आणि कावळीण दोघेही घरटे तयार करण्यासाठी एकत्र झटतात. कावळा घराला लागणाऱ्या काटक्या, कापूस, गवत कावळिणीला आणून देतो, तर कावळीण घराची सुरेख अशी रचना करते. यावेळी त्यांची गडबड मोठी पाहण्यासारखी असते. कारण त्यांना पावसापूर्वी पिल्लांसाठी छानसा निवारा तयार करण्याची घाई झालेली असते. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात. यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.
मी कोकणात असताना समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्षे घालवली. समुद्राचे अथांग विश्व आणि त्यात राहणारे लाखो जीव म्हणजे मानवाला न उलगडणारे निसर्गचक्र आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली तेव्हा काही पूर्वसंकेतांची चाहूल मला मिळू शकली. पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उडय़ा मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनाऱ्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे. समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली सुरू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.
आणखीन एक गंमत म्हणजे पहिल्या पावसानंतर नदी-नाले, ओढे, तलावांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते तसे मासे त्या पाण्यात उडय़ा मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. याबाबतीत अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा.. उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
जंगल आणि डोंगरांच्याही अभ्यासातून काही निरीक्षण समोर आली आहेत. तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.
पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जंगलांवर कु ऱ्हाड चालवली जात आहे. वाघांच्या शिकारी केल्या जात आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. निसर्गचक्राचे घटक असलेले पशुपक्षी आपल्या दिनक्रमात पावसाळ्यापूर्वी कसकसे बदल करतात, हे कुणीही लक्षात घेत नाही याची खूप खंत वाटते.
कीटकांचे जीवनचक्र तर हवामानतज्ज्ञांच्या सर्वतोपरी उपयोगाचे असतानाही या सांकेतिक बदलांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. खरं तर हा निसर्गविज्ञानाचा एक चकित करणारा भाग आहे. हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत. जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात. दुसरे म्हणजे बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

नवेगावबांध पक्षीअभयारण्यातील पक्ष्यांची निरीक्षणे पावसाबद्दल खूप काही सांगणारी आहेत. मोरनाची म्हणून नवेगावला अनेक जागा आहेत. मोरनाची म्हणजे निसर्गाचे एक अवघड कोडे आहे. पावसाळ्यापूर्वी शेकडोंच्या संख्येने मोर अशा जागांवर रिंगणात जमतात आणि एक सुंदर मोर अगदी मधोमध येऊन आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो. त्याचे हे नाचणे म्हणजे एक लयबद्ध नृत्यच असते. कधी दोन्ही पायांवर, तर कधी एका पायावर. तर कधी गिरक्या घेत नाचणाऱ्या या देखण्या नरावर लांडोर/ मोरणी भाळतात. त्यांचा समागम होतो. त्या नराशी समागम केल्यावर लांडोर दूर निघून जाते आणि कालांतराने अंडी घालते. हा पावसाचा पूर्वसंकेत आहे. या भागातील आदिवासी मोरनाचींच्या जागांवर मोर जमू लागल्यानंतर चांगला पाऊस पडणार असल्याचे ठोकताळे बांधतात आणि ते अचूक ठरतात. पक्षी-अभ्यासकांनीही या बदलाचा विस्तृत अभ्यास केल्यास याचे रहस्य कदाचित उलगडू शकेल. कारण या मुक्या जिवांना कोणीही पाऊस येईल म्हणून हवामानाचा अंदाज सांगत नाही; तो त्यांना आपोआपच कळत असतो. पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करताना मी स्वत: मोरांच्या हालचालींवर नजर ठेवून ही निरीक्षणे टिपली आहेत. निसर्गाचे हे चक्र माणसाला कधीही न आकळणारे असते. परंतु त्यामागे पृथ्वीच्या व्युत्पत्तीपासून चालत आलेले निसर्गविज्ञान आहे, हे निश्चित.
वृक्षांमधील बदलांतूनही पावसाळ्यापूर्वीचे काही संकेत स्पष्टपणे मिळतात. यासंबंधीचा अभ्यास मी स्वत: केलेला आहे. मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत. खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो. कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो. बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो. आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू  अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे. अर्थात याकरता आपली नजर तरबेज असली पाहिजे. हवामानतज्ज्ञांची तर अशा बदलांवर बारीक नजर असायला हवी. जंगलाचे नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा बदलांचा अवश्य अभ्यास करावा. कारण ही सूक्ष्म निरीक्षणे हवामानाचा अंदाज वर्तवताना अत्यंत मोलाची ठरू शकतात.

भविष्यवेधी हरिणी आणि वाघ !
हरितपर्णी वृक्षांची आणि पानगळीची जंगले वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात. अशा जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या दिनक्रमातील आश्चर्यकारक बदलांचा अभ्यास केल्यावर पावसाबद्दलचे अचूक आडाखे बांधता येतात. पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. आणि हे अत्यंत खरे आहे. हा बदल मी स्वत: अभ्यासलेला आहे. हरीण आणि वाघ यांचा एरवी ३६ चा आकडा असला तरी पावसाळ्याचे दोन्ही प्राण्यांचे आडाखे मात्र एकदम तंतोतंत जुळणारे असतात, हा सृष्टीतील चमत्कार होय. आणि याला निसर्ग-विज्ञानाची जोड आहे.
वाघिणीचे ठोकताळे तर अत्यंत अचूक असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मेळघाटच्या जंगलात असताना आम्ही एका गर्भवती वाघिणीचे अनेक महिने अत्यंत जवळून निरीक्षण केले. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. तेव्हा वाघांनासुद्धा पावसाच्या अंदाजाचे आणि भविष्यातील वातावरणाचे पूर्वज्ञान असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल.. याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. आम्ही जंगलात तिच्या मागावर राहून हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला आहे. ते वर्ष मला आता नीटसे आठवत नाही. पण माझ्या उमेदीच्या काळातील जंगलभ्रमणाच्या दिवसांत मी अनुभवलेली ही एक आश्चर्यकारक घटना आहे. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला.

snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
In yavatmal front of collectors office Shetkari Warkari Sangathan protested today while celebrated Black Diwali
यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या
mrunal dusanis praises husband neeraj more
लग्नानंतर चार वर्षे दूर राहिले, करिअरमध्ये साथ अन्…; दिवाळी पाडव्याला मृणाल दुसानिसने पती नीरजचं केलं कौतुक
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
power grid
नोकरीची संधी: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये भरती