त्याने निवडलेला चित्रपटांचा विषय, त्यात त्याने साकारलेली भूमिका, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार या कारणांमुळे आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटलं जातं. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा आमिर त्याच्या स्टारडमचा चित्रपटांवर परिणाम होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. याचंच उदाहरण देत आमिरने एका मुलाखतीत गमतीशीर किस्सा सांगितला.

पत्नी किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’च्या चित्रीकरणावेळी घडलेला किस्सा आमिरने सांगितला. ‘चित्रपटातील माझं घर एका गजबजलेल्या बाजाराच्या ठिकाणी होतं. चित्रीकरण सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी पहाटे ३.३० वाजता मी तिथे पोहोचलो. माझ्या स्टारडममुळे चित्रीकरणात अडथळा येऊ नये यासाठी मी त्या घरातून तीन आठवडे बाहेर पडलोच नाही. चाळीत असलेल्या त्या छोट्याशा घरात मी राहत असल्याचं कोणालाच माहित नव्हतं. सुरक्षारक्षकसुद्धा तेथे नसायचे. त्यावेळी माझ्या सगळ्या मिटींग्ज त्याच जागी करावे लागल्या. त्यावेळी ‘गजनी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होता तर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत ‘३ इडियट्स’ या चित्रपटाविषयी चर्चा सुरू होती. एकच खोली होती आणि तिथे चित्रीकरणाचे सर्व सामान होते. त्यामुळे या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी मला बाथरुममध्ये मिटींग्ज कराव्या लागल्या,’ असं आमिर म्हणाला.

वाचा : कंगना रणौतने इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा साधला निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्याने सांगितलं की, ”गजनी’ची संपूर्ण मार्केटींग टीम चक्क बाथरुममध्ये बसून काम करायची. राजकुमार हिरानीसुद्धा त्यांच्या टीमसोबत तिथेच चर्चा करायला यायचे.’ कोणत्याही गोष्टीमुळे कामात अडथळा येऊ नये, हीच भावना मनात ठेवून काम केल्याचं आमिरने स्पष्ट केलं. निश्चितच, याचा चांगला परिणाम प्रेक्षकांना त्याच्या चित्रपटांमध्ये दिसून येतो. २०११ मध्ये आमिरचा ‘धोबी घाट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये प्रतीक बब्बर आणि मोनिका डोग्रा यांचीही भूमिका होती.