हल्ली सोशल मीडियावर लोकप्रिय व्यक्तींची विधाने किंवा चित्रपटातील एखादा प्रसंग किंवा गाणे याचे विडंबन असलेली मीम्स सर्रास पाहायला मिळतात. मीम्स हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच एखाद्या चित्रपटाचा नुसता ट्रेलर जरी प्रदर्शित झाला तरी त्यामधील डायलॉग किंवा गाण्याचा मोजका भाग वापरून नेटकऱ्यांकडून मीम्स तयार केली जातात. ही मीम्स पाहून अनेकदा नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला खरंच दाद द्यावीशी वाटते. बॉलिवूडच्या ‘पद्मावती’ चित्रपटातील गाण्याचे असेच एक मीम सध्या व्हायरल होत आहे.
‘पद्मावती’मधील ‘घुमर’ हे गाणे दीपिका पदुकोणवर चित्रीत करण्यात आलेय. मात्र, संजय श्रीधर या अवलियाने ‘घुमर’मध्ये पिंजरा चित्रपटातील ‘ज्वानीच्या आगीची मशाल हातीsss, आले मी अवसंच्या भयाण राती….’ या गाण्याचा ऑडिओ वापरून एक भन्नाट मीम तयार केले आहे.
‘बिइंग मराठी’ या फेसबुक पेजवरुन हे मीम शेअर करण्यात आले आहे. यामध्ये ‘घुमर’मधील दीपिकाच्या हालचाली आणि ‘दिसला गं बाई दिसला’ गाण्यातील बोल हे कॉम्बिनेशन इतके परफेक्ट जुळून आलेय की तुम्ही पोट धरून हसाल. फेसबुकवर या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत. मात्र, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या दीपिकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो का? तो पोहोचला तर दीपिका यावर कशाप्रकारे व्यक्त होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.