महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (ढरक) पदाच्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाविषयीची सविस्तर माहिती –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (ढरक) या पदासाठी पूर्वपरीक्षा रविवार, २५ ऑगस्ट २०१३ रोजी राज्यातील विविध ३५ जिल्हा केंद्रांवर घेतली जाईल. या परीक्षेसाठी एकूण पदांची संख्या ७१४ इतकी आहे.
या परीक्षेसाठी घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून त्यात १५० प्रश्न एकूण ३०० गुणांसाठी असतात, म्हणजेच प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतात. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना जे ज्ञान असणे अपेक्षित आहे, त्या आधारित प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. जर मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा विचार केल्यास या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम खालील प्रकारे विभाजित करता येतो-
चालू घडामोडी, अंकगणित, सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास (१८५७ पासून ते १९४७ पर्यंत), महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतातील राज्यघटनेतील काही महत्त्वाचे घटक,  पंचायत राज, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था.
चालू घडामोडी
चालू घडामोडी हा सर्वच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तृत घटक आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना जे अपयश येते, त्यात या घटकाचा आवाका लक्षात न आल्याने त्यांची गुणसंख्या घसरते व अंतिम यादीत येण्यासाठी थोडे गुण कमी पडतात. जर आपण पोलीस उपनिरीक्षक (ढरक) या परीक्षेचा विचार केल्यास सुमारे २५ ते ३० प्रश्न या घटकावर विचारले जातात. या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे. यात पुढील घटकांचा समावेश होतो –
अ) आंतरराष्ट्रीय घडामोडी, ब) राष्ट्रीय घडामोडी, क) क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
० आंतरराष्ट्रीय घडामोडी : या घटकावर प्रामुख्याने जागतिक स्तरावर घडत असलेल्या घडामोडी. उदा. एखाद्या देशात झालेले सत्तांतर (सर्बयिा). तेथील नेत्याचे नाव, त्या देशात सत्तेवर आलेल्या सरकारचा पक्ष, नवीन अध्यक्ष इ. याशिवाय जागतिक संघटनेचा अभ्यास व्यवस्थित करावा. उदा. संयुक्त राष्ट्र संघटना, त्याच्या सहयोगी संघटना, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना, ओपेक, सार्क, एशियान, जी-८, जी-२० इ. संघटना त्यांचे मुख्यालय, या संघटनेत सदस्य देश यात घोषित वर्ष, सदस्य देशांच्या झालेल्या बठका यांचा अभ्यास करावा व काही प्रश्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान, पदव्या या उपघटकावरदेखील विचारले जातात. उदा. नोबेल पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय शांतता व नि:शस्त्रीकरण यासाठी देण्यात येणारे पुरस्कार. मागील तीन वर्षांच्या पुरस्कार विजेत्यांची नावे, पुरस्काराचे स्वरूप इ.बाबत अभ्यास करावा.
० राष्ट्रीय घडामोडी : यातील प्रश्न प्रामुख्याने चालू वर्ष तसेच मागील दोन वर्षांच्या घडामोडींवर विचारले जाऊ शकतात. राष्ट्रीय स्तरावर दिले गेलेले पुरस्कार, केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी, देशातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी, या कालावधीत लागलेले शोध, शास्त्रज्ञ, अवकाश संशोधन केंद्र, त्या संबंधित महत्त्वाच्या मोहिमा, आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले अणू करार, साहित्य क्षेत्रात झालेल्या घडामोडींचादेखील अभ्यास करावा. उदा. या वर्षांत व मागच्या वर्षांत चच्रेत असलेली पुस्तके, व त्यांचे लेखक, महत्त्वाच्या नेमणुका उदा. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिव, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष याबाबत अभ्यास करावा.
० क्रीडा घडामोडी : या घटकात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलम्पिक, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल स्पर्धा, २०-२० क्रिकेट सामने, चारही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धाविषयक माहिती, स्पर्धाचे स्थळ, सहभागी देश, विजेता-उपविजेता संघाची नावे, स्पध्रेतील महत्त्वाचे विक्रम यांचा अभ्यास करावा.
त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर घोषित केलेले वर्ष, राष्ट्रीय स्तरावर घोषित केलेले वर्ष, विविध क्षेत्रातील ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवडल्या गेल्या व्यक्तींची नावे, राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे ऑपरेशन उदा. ग्रीन हंट, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एखादा महत्त्वाचा निर्णय, न्यायाधीशांची नावे, जनगणना. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहेत अशा व्यक्तींचे निधन झाले असेल तर त्यांचे कार्यक्षेत्र, त्यांना मिळालेले पुरस्कार यासंबंधीची माहिती असावी.
चालू घडामोडींचा अभ्यास करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे गटचर्चा होय. आपल्यासोबतच या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या चार-पाच विद्यार्थ्यांचा गट तयार करावा व या घटकावर दररोज सुमारे तासभर चर्चा करावी. चच्रेत प्रत्येकजण एकेका घटकावर बोलला, तरी त्यामुळे जास्तीतजास्त घटक कमी कालावधीत पूर्ण करता येतील.
अंकगणित
या घटकावर २० ते २५ प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण या घटकावर जास्तीतजास्त गुण मिळवून अंतिम यादीत आपले स्थान निश्चित करण्यास संधी असते. अंकगणितावर प्रश्न प्रामुख्याने पाचवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. या घटकात पुढील प्रश्न विचारले जातात- बेरीज-वजाबाकी, गुणाकार , भागाकार, सरासरी,  भूमिती,  काळ, काम व वेग, खरेदी विक्री, दशांश अपूर्णाक इ.
० बेरीज – यात दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी संख्यांची बेरीज व बेरजेवर आधारित समीकरण, वर्ग व वर्गाची बेरीज, सम व विषम यांची बेरीज, सरळ रूप द्या.
० वजाबाकी – तीन अंकी किंवा चार अंकी किंवा पाच अंकी संख्येची वजाबाकी, अपूर्णाकांची वजाबाकी, वर्ग किंवा वर्गमुळांची वजाबाकी.
० गुणाकार – दोन किंवा तीन अंकी संख्यांचा गुणाकार घनसंख्या किंवा वर्गसंख्या किंवा वर्गमूळ यांचा गुणाकार पदावलीचा विस्तार, अपूर्णाकाच्या पदावलीस सरळरूप देणे, गुणक किंवा पटीवर आधारित प्रश्न, संख्यांची टक्केवारी.
० भागाकार – दोन किंवा तीन अंकी संख्यांचा भागाकार वर्गमूळ किंवा घनसंख्या यांचा भागाकार, भागाकारावर आधारित अपूर्णाकाच्या पदावलीला सरळरूप देणे.
० सरासरी – वय, तापमान, वजन, किंमत, गुणसंख्या, क्रिकेटपटूंच्या धावा यावर आधारित गणिते.
० भूमिती – त्रिकोणाचे कोन, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ, आयाताची परिमिती व क्षेत्रफळ, दंडगोल व शंकूचे आकारमान यावर आधारित प्रश्न.
० काळ, काम व वेग –  एखाद्या वाहनाने ठरावीक वेळात कापलेले अंतर, एका स्थानकावरून एकाच दिशेने किंवा विरुद्ध दिशेने सुटलेली रेल्वे किंवा बस यांना एकमेकांना भेटण्यास लागणारा वेळ यावर आधारित प्रश्न, एखादे काम, ठरावीक व्यक्तीने, ठरावीक वेळेत पूर्ण केले असेल व तेच काम व्यक्तींची संख्या वाढवली किंवा कमी केली किंवा फक्त वेळ वाढवली किंवा कमी केली तर ते काम कसे होईल यासंबंधीचे प्रश्न.
खरेदी-विक्री – नफा-तोटा, छापील किंमत, विशिष्ट क्रमाने आलेली मालिका, शेकडेवारी इ. घटकांचा अभ्यास करावा.
सामान्य विज्ञान
० आरोग्य शास्त्र – या घटकावर प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारले जातात. यात मानवाला होणारे आजार, त्यांचा प्रादुर्भाव करणारे घटक, जीवनसत्त्व कुपोषण, मानवी शरीरातील अवयव, रक्ताभिसरण संस्था, दृष्टिदोष तसेच वैद्यकीय क्षेत्रातील शोध.
० वनस्पती शास्त्र – वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पती पेशी व ऊती, प्रकाश संश्लेषण, संप्रेरके, अन्नसाखळी, वनस्पतीजन्य रसायने (उदा. स्टार्च, सेल्युलोज इ.)
० प्राणिशास्त्र – प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांचे अवयव, पेशी शास्त्र
० भौतिक शास्त्र – एकके, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत शास्त्र, चुंबकत्व, खगोलशास्त्र, आण्विक शास्त्र यांतील महत्त्वाच्या संकल्पना, यांवर आधारित काही गणिते, अवकाश विज्ञान, आण्विक शास्त्र, दूरसंचार, रसायन शास्त्र, मिश्र धातू, आम्लांचे प्रकार, विविध पदार्थाचे रासायनिक गुणधर्म, दावण, काचेचे रंग, कार्बन, इंधन इ.
भारताचा इतिहास (१८५७ ते १९४७)
० राष्ट्रीय सत्याग्रह, चळवळ – १८५७ चा उठाव, त्याची कारणे, तो दाबून टाकण्यासाठी यशस्वी झालेले इंग्रज अधिकारी, चले जाव चळवळ, मंदिर प्रवेश सत्याग्रह, भूदान चळवळ, भिल्लांचा उठाव इ. यांची कारणे, परिणाम या उठावात असणारे नेते इ. अभ्यास करावा.
० पक्ष, संस्था व संस्थापक- १८५७ ते १९४७ दरम्यान स्थापन झालेले पक्ष, स्थापनेचे वर्ष व स्थापन केलेल्या संस्थापकांची नावे इ.
० सामाजिक प्रबोधन- समाजसुधारक, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था उदा. आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज इ.
० काँग्रेसचे अधिवेशन- स्थळ, अध्यक्ष व ठराव.
० वृत्तपत्र, ग्रंथलेखक- दर्पण, ज्ञानप्रकाश, मूकनायक, केसरी, मराठा, आनंदमठ इ.
० क्रांतिकारक- स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, फडके इ.
० कायदे, परिषदा, करार- क्रिप्स मिशन, सायमन कमिशन, पुणे करार, वृत्तपत्र कायदा इ.
० प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते व व्हाइसरॉय इ.- पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लॉर्ड कॅिनन, मेकॉले इ.
० ऐतिहासिक स्थळे, वर्ष, महत्त्वाच्या घटना- लाहोर, मुंबई, दिल्ली, पाटणा, फैजापूर, आवडी, सुरत.
महाराष्ट्रातील समाजसुधारक
या घटकावर प्रश्न प्रामुख्याने गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांची काय्रे, त्यांच्या संस्था, त्यांचे विचार, त्यांचे वृत्तपत्र, त्यांनी केलेल्या घोषणा यांवर प्रश्न विचारले जातात.
भारताची राज्यघटना व राज्यव्यवस्था
० राज्यघटनेची निर्मिती- भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टे, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्टय़, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, महत्त्वाची कलमे, कलम ३६८, कलम ३७०, कलम ३५२ व कलम ३१ इ.
० कायदे मंडळ – विधान परिषदेची रचना, मुदत व काय्रे, राज्यसभेची रचना व काय्रे, महत्त्वाच्या घटनादुरूस्त्या, अर्थ विधेयकांच्या मंजुरीबाबत, राज्यसभेचे अधिकार, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती, संसदेचे संयुक्त अधिवेशन, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, राजकीय पक्ष, त्यांचे संस्थापक
० कार्यकारी मंडळ – राष्ट्रपती, राज्यपाल, त्यांचे अधिकार किंवा राष्ट्रपतींचा वटहुकूम, राष्ट्रपतींतर्फे केल्या जाणाऱ्या नेमणुका.
० न्याय मंडळ – सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सरन्यायाधीश, उच्च न्यायाधीश त्यांच्या नेमणुकीची पद्धत वयोमर्यादा, वेतन व भत्ते इ.
पंचायत राज
या घटकावर पाच ते सात प्रश्न विचारले जातात-
० पंचायत राजची निर्मिती – ७३ वी घटना दुरुस्ती व ७४ वी घटना दुरुस्ती, विविध समित्या. उदा. बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती, पी. बी. पाटील समिती इ.
० ग्रामपंचायत – ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, ग्रामसभा पदाधिकाऱ्यांचे वेतन, त्यांचे लेखापरीक्षण, अविश्वास ठराव, ग्रामसेवक इ.
० तालुका पंचायत समिती- सभापती, उपसभापती, त्यांची निवड, त्यांच्यावरील अविश्वास ठरावाची पद्धत, गटविकास अधिकारी, लेखा अधिकारी यांचे वेतन, त्यांची नेमणुकीची पद्धत यांचा अभ्यास.
० जिल्हा परिषद – जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांची निवड पद्धती, त्यांचे कार्य, अविश्वास ठराव, मुख्य कार्यकारी अधिकारी, वार्षकि अंदाजपत्रक, जिल्हा नियोजन व विकास मंडळ इ. अभ्यास.
० महसूल व पोलीस प्रशासन – जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांची कामे, तलाठय़ाच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी, सातबारा उतारा.
भूगोल
या घटकांतर्गत जग, भारत, महाराष्ट्र यासंदर्भात प्रश्न विचारले जातात. मात्र सर्वात जास्त भर महाराष्ट्राचा भूगोल व भारताचा भूगोल यांवर असतो. या घटकाचा अभ्यास करताना नकाशा वाचन अवश्य करावे. कारण परीक्षेच्या नव्या स्वरूपानुसार विचारले जाणारे बरेच प्रश्न नकाशासंबंधित आहेत. या घटकाचा अभ्यास करताना क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने, पीक उत्पादनाच्या दृष्टीने, साक्षरतेच्या दृष्टीने चढता-उतरता क्रम यांचा अभ्यास करावा. महाराष्ट्राचे विविध जिल्हे, त्यांची विशेषत: तेथील हवामान इ. अभ्यास करावा.
भारतातील राज्ये, विशेषत: ईशान्येकडील राज्ये व इतर राज्ये यांची वैशिष्टय़े, भारतातील व राज्यातील जंगलसंपत्ती, पर्जन्यछायेचा प्रदेश, अवर्षणग्रस्त प्रदेश, वारे तसेच भारतातील व महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था, बंदरे, विविध घाट यांचा अभ्यास करावा. देशातील महत्त्वाचे अणुशक्ती केंद्र, जास्त घनतेचे व कमी घनतेचे राज्य इ. अभ्यास करावा. अभ्यासात पुढील घटकांचा समावेश असावा.
० पृथ्वी – सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, धूमकेतू, पृथ्वीवरील वारे
० हवामान व पर्जन्य – हवामानाचे प्रकार, तापमान, उष्ण कटिबंधीय, शीतकटिबंधीय हवामान.
० अंक्षाश व रेखांश – स्थानिक प्रमाण वेळ, अक्ष व रेखावृत्त, भौगोलिक वैशिष्टय़े.
० जमिनीचे प्रकार व पिके – काळी मृदा, रेगूर, जांभीय, तांबडी मृदा, पिके, पिकांची उत्पादने त्यांचा क्रम इ.
० नद्या – राज्य, देश व जगातील प्रमुख नद्या, त्यांचा लांबीनुसार चढता व उतरता क्रम, त्यांच्यावरील प्रमुख धरणे इ. अभ्यास करावा.
० खनिज संपत्ती – महाराष्ट्रातील व भारतातील प्रमुख खनिज साठे उदा. दगडी कोळसा, लोखंड इ.
० महत्त्वाची शहरे – देशातील व महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे, उदा. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, येवला, सावंतवाडी, कल्याण-डोंबिवली, कोटा, तारापूर, इंफाळ, चेन्नई इ.
अर्थव्यवस्था
या घटकाचा अभ्यास करताना अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाच्या संकल्पना व्यवस्थित समजून घेऊन मग या घटकाचा अभ्यास करावा. गेल्या काही दिवसांपासून आयोग संख्यात्मक माहितीवर सहसा प्रश्न विचारत नाही तर मूलभूत संकल्पना व सिद्धांतावर प्रश्न विचारले जातात.
० पंचवार्षकि योजना – नियोजन मंडळ, त्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, राष्ट्रीय विकास मंडळ, त्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, पहिली ते १२ पंचवार्षकि योजनेचा कालावधी व या काळातील महत्त्वाच्या घटना उदा. सिंदी खत कारखाना कोणत्या पंचवार्षकि योजनेच्या काळात सुरू करण्यात आला, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षकि योजनेत देण्यात आली, याविषयीचे प्रश्न.
० बँका – रिझव्‍‌र्ह बँक, स्टेट बँक, ग्रामीण बँका, त्यांची स्थापना, त्यांची वैशिष्टय़े, बँकाचे राष्ट्रीयीकरण इ.
० इतर घटक – उदा. भाववाढ, भाववाढीचे कारण, वीस कलमी कार्यक्रम, मनरेगा, बेरोजगोरी, त्याचे प्रकार, रेपो व रिव्हर्स रेपो यासंबंधीचा अभ्यास.
विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी वरील घटकांचा व्यवस्थित अभ्यास करावा, तसेच जास्तीतजास्त वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) प्रश्नांची तयारी करावी.

(पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या अर्जप्रक्रियेची माहिती देणारा लेख पान तीनवर आहे. )