इंटरनेटवरील एका ऑनलाईन स्कीमसंदर्भात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गुरूवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरा गेला. ‘ईडी’च्या लखनऊ येथील विभागीय कार्यालयात नवाजुद्दीनची चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या ऑनलाईन स्कीमचे संचालक आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यातील आर्थिक संबंध उघड झाले होते. त्यानंतर ‘ईडी’ने नवाजुद्दीनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. या समन्समध्ये संबंधित कंपनीकडून मिळालेल्या १.१५ कोटींच्या रकमेप्रकरणी नवाजुद्दीनकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.

वेब वर्क ट्रेड लिंक्स या कंपनीची उपकंपनी असलेल्या अॅडस् बुक्सकडून एका ऑनलाईन मॉडेलच्या सबस्क्रिप्शनसाठी जाहिरात केली जात होती. युजर्सनी यामधील जाहिरातींच्या लिंकवर क्लिक केल्यास त्यांना पैसे मिळतील, असे या जाहिरातीमध्ये म्हटले होते. परंतु, ही योजना संशयित वाटल्यामुळे ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मी तर १०० टक्के कलाकार! नवाजुद्दिनचा ‘बोलका’ पण अबोल व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच स्वत:च्या आयुष्यावरील ‘अॅन ऑर्डीनरी लाइफ’ या चरित्रात्मक पुस्तकावरून नवाजुद्दीन सिद्दिकी वादात सापडला होता. या पुस्तकामधील काही खळबळजनक गौप्यस्फोटांमुळे नवाजुद्दीनला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर नवाजने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. नवाजच्या या पुस्तकात त्याने आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. पूर्वाश्रमीची प्रेयसी सुनीता राजवार, अभिनेत्री आणि सहकलाकार निहारिका सिंगसोबतचं अफेअर याविषयी त्याने लिहिलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींनी यावर आक्षेप घेत नवाजवर सडेतोड टीकादेखील केली होती. त्यामुळे चरित्राच्या अनावरणापासूनच पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

नवाजुद्दीन सिद्दीकी ‘ते’ वादग्रस्त पुस्तक मागे घेणार