अफगाणिस्तानवर ताबा मिळवत तालिबान्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. देशातील नागरिकांचं आयुष्य धोक्यात आलंय. खास करून तालिबान्यांनी महिलांचा छळ करण्यास सुरुवात केलीय. सिनेमा, फोटोग्राफीला तालिबान्यांचा निषेध असल्याने खास करून या क्षेत्रातील महिलांना आपला जीव मुठीत घेऊन देशातून पळ काढण्याखेरीज कोणताही पर्याय समोर उरलेला नाही.

अफगाणिस्तानमधील नागरिकांसोबतच कलाक्षेत्रातील अनेक लोक देश सोडत आहेत. अफगाणी चित्रपट निर्मात्या आणि छायाचित्रकार रोया हैदरी यांनी देश सोडून जात असताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट काळीज पिळवटून टाकणारी आहे. या पोस्टमध्ये हैदरी यांनी लिहिलंय, “आवाज उठवणं सुरु ठेवण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य, माझं घर सोडलं. पुन्हा एकदा, मी माझ्या मातृभूमीतून पळ काढत आहे. पुन्हा एकदा, मी शून्यापासून सुरुवात करणार आहे. मी फक्त माझे कॅमेरा आणि एक एक मृत आत्मा घेऊन महासागराच्या पलिकडे निघाले आहे. परत भेट होईपर्यंत हे मातृभूमी जड अंतःकरणाने तुझा निरोप घेते” अशी हृदयद्रावक पोस्ट निर्मात्या रोया हैदरी यांनी शेअर केलीय. रोया यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

हे देखील वाचा: बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानला तालिबान्यांनी दिली होती जीवे मारण्याची धमकी; शेअर केला ‘तो’ भयानक अनुभव

या पोस्टसोबत रोया यांनी काबूल विमानतळावरील शेअर केलेला फोटो देखील बरचं काही सांगून जातो. रोया यांनी शेअर केलेल्या फोटोत असंख्य नागरिक विमानतळावर सुटकेसाठी विमानाची वाट पाहत बसले असल्याचं दिसतंय. तर रोया यांच्या चेहऱ्यावर मास्क असलं तरी त्यांच्या नजरेत मातृभूमीला सोडून जाण्याचं दु:ख तरळताना दिसतंय.

हे देखील वाचा: ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ‘तो’ शब्द उच्चारताना अमिताभ बच्चन यांची देखील बोबडी वळली

१९९६ ते २००१ या काळामध्ये तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील अनेक भागात आपली सत्ता गाजवत महिलांवर कडक निर्बंध लादले होते. यात महिलांना काम करण्यात बंदी होती. त्यांच्यावर बुरखा परिधान करण्याची सक्ती लादण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा हेच चित्र देशात पाहायला मिळतंय. यामुळेच रोया यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. काबूल विमानतळावरील फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली.अल जझीराच्या वृत्तानुसार रोया यांना देश सोडून जाण्यात यश मिळालं असून पाच दिवसांपूर्वीच त्या फ्रान्सला पोहचल्या आहेत.

दरम्यान, देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधून समोर येणारी विध्वंसक दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारी आहेत.