गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नरोडा पतिया दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी मंत्री माया कोडनानी यांच्याकडून शुक्रवारी विशेष न्यायालयापुढे नव्याने अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जात माया कोडनानी यांनी त्यांचे साक्षीदार म्हणून अमित शहा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. नरोडा पतिया दंगलीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आपल्या बाजूने साक्ष देणार असल्याचा कोडनानी यांचा दावा आहे. मात्र, अजूनपर्यंत अमित शहा एकदाही कोडनानी यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी न्यायालयात आलेले नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने अमित शहांना साक्षीदार म्हणून हजर करण्याची शेवटची संधी कोडनानी यांना दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, तोपर्यंत कोडनानी अमित शहा यांना न्यायालयात हजर न करू शकल्यास न्यायालय अंतिम निकाल देईल, असे न्यायमूर्ती पी.बी. देसाई यांनी सांगितले.
या खटल्यातील माझे साक्षीदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र असतात. याशिवाय, मला अजूनपर्यंत त्यांच्या निवासस्थानाचा पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठीचे समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलेले नाही. आतापर्यंत न्यायालयाने साक्षीदाराची तपासणी करण्याची माझी विनंती प्रत्येक वेळी मान्य केली आहे. कृपा करून मला आणखी काही दिवसांची मुदत द्यावी, असे कोडनानी यांनी आपल्या विनंती अर्जात म्हटले आहे.
२००२ मध्ये गुजरातभर उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोडा पतिया येथील दंगल विशेष कुख्यात ठरली होती. यामध्ये ११ मुस्लिम व्यक्तींचा मृत्यू झाला होता. माया कोडनानी त्या वेळी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. या दंगलींप्रकरणी कोडनानी यांच्यासह बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी व अन्य २९ जणांना विविध शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.