आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी अवघं एक पाऊल दूर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. शनिवारी दुपारी दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात दिल्लीच्या संघाचं पानिपत झालं. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करत दिल्लीला ११० धावांवर रोखलं. यानंतर फलंदाजीत सलामीवीर इशान किशनने तुफान फटकेबाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली. ९ गडी राखत सामना जिंकत मुंबई इंडियन्सने इतर संघांसाठी प्ले-ऑफचं गणित अधिक खडतर केलं आहे. सुरुवातीच्या सामन्यांपासून चांगली खेळी करणाऱ्या दिल्लीच्या गोटात मात्र मुंबईविरुद्धच्या पराभवामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

“आमच्या खेळात अनेक त्रुटी होत्या, पण आम्ही सकारात्मक राहून पुढचा विचार करायचं ठरवलं आहे. खेळपट्टी ओळखण्यात आम्ही पूर्णपणे चुकलो. पॉवरप्लेच्या षटकांपासूनच आम्ही योग्य खेळ केला नाही. आमच्यापैकी काही खेळाडूंनी भागीदारी करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतू हे होताना दिसत नाहीये, तुकड्या-तुकड्यात काही खेळाडूं चांगला खेळ करतायत. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली की नंतर धावसंख्या १५० पार पोहचवता येते.” सामना संपल्यानंतर निराश श्रेयस अय्यरने आपली प्रतिक्रिया दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईकर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल

मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीने अजिंक्य रहाणेला बाहेर करत पृथ्वी शॉला संधी दिली. परंतू पृथ्वी या सामन्यातही अपयशी ठरला. दिल्लीचा पुढचा सामना रविवारी RCB विरुद्ध असणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी संघात काही बदल करणार का असं विचारलं असता श्रेयस अय्यरने त्याबद्दल विचार करावा लागेल असे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्लीचा संघ प्ले-ऑफचं स्थान मिळवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा –  IPL 2020 : तीन बळी घेत जसप्रीत बुमराहचा विक्रम, दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत मिळालं स्थान