चेन्नई सुपरकिंग्जचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाहीये. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. Sportsstar संकेतस्थळाने यासंदर्भातली बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं आहे. सुरुवातीला आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हरभजन दोन आठवडे उशीरा युएईत दाखल होणार होता. १ सप्टेंबरपर्यंत हरभजन सिंह युएईत दाखल होणं अपेक्षित होतं.
परंतू ती वेळ निघून गेल्यानंतर हरभजनने माघार घेण्याचं ठरवलंय. हरभजनने ट्विट करत आपण यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याचं जाहीर केलंय. मला माझ्या परिवारासोबत थोडा वेळ घालवायचा आहे, CSK च्या प्रशासनाशी माझी चर्चा झाली असून त्यांचा मला पाठींबा असल्याचं हरभजनने म्हटलंय.
Dear Friends
I will not be playing IPL this year due to personal reasons.These are difficult times and I would expect some privacy as I spend time with my family. @ChennaiIPL CSK management has been extremely supportive and I wish them a great IPL
Stay safe and Jai Hind— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2020
युएईत दाखल झालेल्या चेन्नईच्या संघासमोर गेल्या काही दिवसांमध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. सर्वात प्रथम दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. याचसोबत संघातील १२ सपोर्ट स्टाफचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला होता. यानंतर सर्व बाधित व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं. या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर चेन्नईचा संघ सरावाला सुरुवात करणार आहे. याचसोबत संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात CSK कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
अवश्य वाचा – IPL 2020 : कॉमेंट्री पॅनलमध्ये संजय मांजरेकरना स्थान नाही