शासनातर्फेच होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी संकल्प चित्र (डिझाईन) हा चौथा पेपर असतो. अडीच-तीन तास वेळ असतो.
पूर्वी परीक्षेसाठी ठराविक पद्धतीचे संकल्पन होते. त्यात पूर्वी अजिंठा-वेरुळ येथील कोरीव कामे व रेखाटने हमखास विचारत. राजहंस, कमळ व त्यांची गुंफण करायला सांगत. ती क्लिष्ट पद्धत बदलून आता शिंतोडे उडविलेले रंग, ठिपके दिलेले, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे वेडेवाकडे चौकोन, त्रिकोण आदिवासी कला नमुने असे रेखाटन अपेक्षित असते. पूर्वीच्या संकल्पनात आखीव रेखीवपणा होता. पट्टीच्या साहाय्याने चौकोन, त्रिकोण काढणे सक्तीचे असे. आता हाताने रेखाटन करणे याला महत्त्व दिले आहे. एकच आकार काढण्यासाठी ट्रेस पेपरचा वापर न करता जसा आकार असेल तसा काढणे किंबहुना जसा एक आकार असेल त्यापेक्षा दुसरा आकार बदलून काढणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे स्वच्छंद स्वर आकारही डोळ्यांना सुखावित असतात. असे जरी असले तरी संकल्पने ही तोल, लय, पुनरावृत्ती हा मूळ तत्त्वावर आदारलेली असतात. तर गुंफण व आंच्छादन, भौमितिक आकार रचना, अक्षरांच्या संकल्परचना, भौमितिक अलंकारिक, नैसर्गिक आणि केवलाकार यातून चित्रे संकल्प तयार करणे आवश्यक असते.
परीक्षेसाठी विशिष्ट घटक देण्यात येतात. त्यांची गुंफण व आच्छादने आवडी निवडीप्रमाणे करण्यास सांगण्यात येते. रंगसंगतीही विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन साधावी लागते. रंगसंगतीची निवड करताना संकल्पचित्र कोणत्या माती, काच, प्लॅस्टिक, दगड, लाकूड, फरशी यापैकी याचा कोणत्या माध्यमाचे आहे, याचा विचार करणे आवश्यक असते. काही वेळा पोत (टेक्श्चर) करून आभास निर्माण करावा लागतो. पोत हे चित्राच्या पृष्ठभागाचे अलंकरण आहे. पोताचा रंग हा पाश्र्वभूमीच्या रंगाशी सुसंगत असावा लागतो. पाश्र्वभूमीला दिलेला रंगच थोडासा गडद अगर फिका करून पोतासाठी वापरल्यास कलाकृती अधिकच उठावदार दिसते. पोपटीवर गर्द हिरवा, निळ्या आकाशीवर जांभळा आणि अशा तऱ्हेचे संबंधित रंग वापरल्याने पोत खुलून दिसतो. पोताचे काम करताना चित्रातील घटक आकाराचे महत्त्व कमी होत नाही ना, हे पहावे लागते. घटकांचे महत्त्व लक्षात घेऊन पोताचे रंगकाम करणे सुलभ होऊ शकेल.
एकूणच संकल्पनात तुमच्या इच्छाशक्तीला भरपूर वाव आहे. या संकल्पनात मुक्तपणे काम करता येते. मात्र दिलेल्या विषयाचा आशय स्पष्ट व्हायला हवा. रेखाटन आणि रंगकामासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी असतो. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, चौरस रेषा आणि पाने, फुले, पक्षी असे विविध घटक देण्यात आलेले असतात.
या घटकांची संकल्परचना करून त्यात रंग भरताना पुढील गोष्टी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
लांबी ३० सें.मी. व रुंदी ११ सें.मी. असा आयात काढा. आयाताच्या कोणत्याही एका लांबीच्या बाजूवर आयातात एक से.मी. किनार काढा. आयाताचे लांबीच्या बाजूने सारखे तीन भाग करा. एका भागामध्ये ‘साडी किनारीसाठी’ दिलेल्या घटकांचा उपयोग करून संकल्प रचना तयार करा. रचना राहिलेल्या दोन भागांमध्ये ट्रेसिंग पेपरने छापून पूर्ण करा. घटक- १) तीन फुलांचे आकार, २) दोन पानांचेोकार, ३) दोन असमान चौरस, ४) एक पक्ष्याचा आकार, जलरंगाने संकल्पचित्र पूर्ण काढा.
१) मूळ बाह्य़ाकाराचे माप लक्षात ठेवून बाह्य़ाकार बरोबर काढावा. अनेकदा आत एखादा याच आकाराचा छोटा आकार काढावयास सांगतात. तोही अचूक मापात काढावा. यापैकी एखादा भाग मोकळा ठेवण्यास सांगतात. तसा तो ठेवण्याची दक्षता घ्यावी. नाहीतर गुण कमी होतील.
२) बाह्य़ाकारात बसविण्यासाठी जे आकार दिलेले असतात त्याच्या एक-दोन रचना कच्च्या व छोटय़ा स्वरूपात करून बघाव्यात. त्यातून चांगली वाटलेली रचना स्वीकारावी.
३) मोठे घटक आधी काढून त्याच्या अनुषंगाने त्याला साजेसे छोटे घटक काढावेत.
४) घटक काढताना सर्व कोपरे व्यापले जावेत म्हणजे जागा रिकामी वाटत नाही. घटक शक्यतो एकाआड एक व थोडेसे एकमेकांवर आच्छादित असे काढावे.
५) आच्छादित भागांच्या विभाजनात विविधता असावी. घटकांच्या मांडणीत तिरपेपणा व दिशांची जागा बदलली तर आकर्षकपणा वाढतो.
६) आच्छादित भागास वेगळा रंग देऊन रंगाची विविधता साधा.
७) रंगसंगतीत शीत, उष्ण असे प्रकार असल्याने आणि त्यामध्ये गडद, मध्यम व फिकट असे तीन प्रकार दाखविल्याने संकल्पचित्र देखणे होते.
शासकीय दुसऱ्या परीक्षेसाठी (इंटरमिजिएटसाठी) फुलराणी, बशी, मातीचे भांडे, पंखा, साडी किनार यासारख्या वस्तूंसाठी संकल्परचना तयार करण्यास सांगतात. पक्षी, फुले, पाने, मासे यांचे अलंकारिक आकाराचे घटक घेऊन त्यात वापर करण्यास सांगितले जाते. अशा वेळी वरील सूचनांप्रमाणे रेखाटन व रंगकाम केल्यास संकल्प चित्राच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळू शकतील.
-सुनीती जाधव (आंबिलढोक)
प्राचार्या, चित्रलीला निकेतन, पुणे
क्रमशः
आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
स्मृतिचित्रे कशी काढावी? (भाग चार)
स्थिर चित्र कसे काढावे? (भाग तीन)
रंगछटा हाच निसर्गचित्रणातील पहिला टप्पा (भाग दोन)
शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेविषयी (भाग एक)