२०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. निवड समितीने ऋषभ पंतला आपली पहिली पसंती दर्शवली असून यापुढील मालिकांमध्ये पंतलाच पहिली पसंती मिळणार असल्याचं निवड समितीने स्पष्ट केलं होतं. मात्र विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत ऋषभची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. फलंदाजीत काही सामन्यांचा अपवाद वगळता ऋषभ सतत अपयशी होत आला आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यातही ऋषभने रोहितला DRS घेण्यासाठी चुकीचा सल्ला दिल्यानंतर त्याला टीकेचा भडीमार सहन करावा लागला होता. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी धोनीला संघात जागा देऊन पंतला बाहेर बसवला अशी मागणी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टनेही पंतला धोनी बनण्याचा प्रयत्न करु नकोस असा सल्ला दिला आहे. तो एका खासगी कार्यक्रमात बोलत होता. “मी पंतला कायम एकच सल्ला देईन, धोनीकडून सर्वकाही शिकून घेण्याचा प्रयत्न कर. फक्त धोनी बनण्याचा प्रयत्न करु नकोस. मैदानात त्याने स्वतःचा खेळ करावा.” याचसोबत गिलख्रिस्टने भारतीय चाहत्यांनीही धोनी आणि पंतची तुलना करु नये असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – BLOG : पंतचं अपयश ही कोणाची चूक?

“ऋषभ पंत गुणवान खेळाडू आहे. त्याच्यावर आता अधिक दबाव टाकणं योग्य होणार नाही. इतक्या कमी कालावधीत तो धोनीसारखी कामगिरी करेल अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे. मला कधीच कोणत्याही खेळाडूची कोणत्याही खेळाडूसोबत तुलना करणं आवडत नाही. धोनीने आपला खेळ एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवला आहे, एक दिवस त्याच्या तोडीचा खेळाडू येईलच.” गिलख्रिस्टने धोनी आणि पंतच्या तुलनेवर आपलं मत व्यक्त केलं.