बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने विजयासाठी दिलेलं १४९ धावांचं आव्हान बांगलादेशने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. संपूर्ण सामन्यात बांगलादेशने भारतावर वर्चस्व गाजवलं. या सामन्यादरम्यान ऋषभ पंतला सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सहन करावा लागतो आहे.

अवश्य वाचा – BLOG : पंतचं अपयश ही कोणाची चूक?

या सामन्यात १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक घटना घडली. युझवेंद्र चहल गोलंदाजी करत असताना चेंडू फलंदाजाच्या बॅटच्या अगदी जवळून गेला. चेंडू बॅटला लागला की नाही हे गोलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा यांना समजले नाही. त्यामुळे यष्टीरक्षक ऋषभ पंतचा सल्ला घेण्यात आला. पंत DRS घेण्याचा सल्ला दिला, पण अखेर चेंडू बॅटला लागला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भारताचा रिव्ह्यू वाया गेला. या घटनेमुळे रोहितने ऋषभला पाहून चक्क कपाळावर हात मारून घेतला. मात्र या चुकीनंतरही रोहितने ऋषभ पंतचं समर्थन केलं आहे.

“ऋषभ तरुण खेळाडू आहे आणि काही गोष्टी त्याला समजावून घ्यायला वेळ लागेल. DRS सारखे निर्णय तो योग्य घेईल असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. कर्णधार म्हणून ज्यावेळी तुम्ही मैदानात योग्य ठिकाणी नसता त्यावेळी तुम्हाला यष्टीरक्षक आणि गोलंदाजावर अवलंबून रहावं लागतं. त्यांना जे योग्य वाटतं त्यावरच आपल्याला विश्वास ठेवायला लागतो.” रोहितने ऋषभची पाठराखण केली. सध्या बांगलादेशने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader