सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले.
अवश्य वाचा – IPL 2020 : आनंदाची बातमी, रोहित शर्मा लवकरच पुनरागमन करणार !
मैदानात मोठमोठे फटके कसे काय खेळतोस याबद्दल विचारलं असता इशान किशन म्हणाला, “जेवढं वाटतं तेवढं ते नक्कीच सोपं नव्हतं. सुरुवातीला बॉल योग्य पद्धतीने बॅटवर येत नव्हता त्यामुळे स्ट्राईक रोटेट करुन खराब चेंडूची वाट पहावी लागत होती. बाकी फटकेबाजीचं म्हणायला गेलं तर तुम्ही कसा सराव करताय यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. माझ्या फटकेबाजीचं श्रेय आई माझ्यासाठी जे जेवण बनवते त्याला मिळायला हवं. तिच्या हातचं खाऊन मला खूप ताकद येते. कधीकधी मी मारलेले फटके पाहून मलाच आश्चर्य वाटतं की मी इतका लांब कसा मारु शकलो.” सामनावीराचा पुरस्कार स्विकारताना हर्षा भोगले यांना इशानने उत्तर दिलं.
अवश्य वाचा – IPL 2020 : तीन बळी घेत जसप्रीत बुमराहचा विक्रम, दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत मिळालं स्थान
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशनला क्विंटन डी-कॉकसोबत सलामीला येण्याची संधी मिळते आहे. संघात कितव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल असं विचारलं असता, जिथे गरज असेल तिकडे फलंदाजी करण्यासाठी आपण तयार असल्याचं किशनने सांगितलं. दरम्यान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने ३-३ बळी घेत दिल्लीच्या डावाला खिंडार पाडत ११० धावांपर्यंत रोखलं.