भारतात क्रिकेट या खेळाला धर्माचं रुप दिलं जातं. कोणताही सामना असो भारतीय क्रिकेटप्रेमी आपली सर्व कामं सोडून टीव्हीसमोर बसून राहतात. त्यातच आयपीएलच्या आगमनानंतर देशातील अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे. अनेकदा खेळाडूंवर लाखो रुपयांच्या बोली लागत असल्यामुळे अनेक क्रिकेटपटू आयपीएल खेळण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत करत असतात. उत्तर प्रदेशचा रिंकू सिंहचं आयुष्यही आयपीएलने अशाच पद्धतीने एका झटक्यात बदलून टाकलं. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्वाचा खेळाडू असलेल्या रिंकू सिंहची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य पाहा – KKR च्या खेळाडूंची युएईत खास सोय : या अलिशान हॉटेलमध्ये राहणार…

रिंकू सिंह मुळचा उत्तर प्रदेशातील अलिगढचा राहणारा…लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या रिंकूचं अभ्यासात फारसं लक्ष लागलं नाही. नववीत नापास झाल्यानंतर रिंकूने शिक्षण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. पण घरातली बेताची आर्थिक परिस्थिती पाहता रिंकूला काही दिवस काम करावं लागलं. रिंकूच्या भावाने त्याला एका कार्यालयात झाडू मारण्याचं काम मिळवून दिलं. पण रिंकूचं यात मन लागलं नाही. काही महिन्यांनी रिंकू दिल्लीत एका क्रिकेट मालिकेत खेळला, ज्यात त्याला मालिकावीराचा पुरस्कार म्हणून एक मोटारसायकल मिळाली. उत्तर प्रदेशात सिलेंडर पोहचवण्याचं काम करणाऱ्या आपल्या वडिलांना रिंकूने ही मोटारसायकल दिली. रिंकूला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. रिंकूचा एक भाऊ हा रिक्षा चालवतो तर एक भाऊ हा कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतो.

यादरम्यान रिंकू स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. २०१४ साली अ श्रेणीच्या सामन्यांमध्ये रिंकूने उत्तर प्रदेशाकडून खेळायला सुरुवात केली. विदर्भाविरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केलं. यानंतर पुढच्या वर्षी रिंकूला उत्तर प्रदेशच्या रणजी संघातही स्थान मिळालं. या स्पर्धेतही रिंकूने आश्वासक कामगिरी करत आपली छाप पाडली. यादरम्यान क्रिकेटमधून मिळणाऱ्या पैश्यांवर रिंकूचं घर चालायला लागलं होतं. २०१८ साली रिंकूच्या आयुष्यात अखेरीस तो क्षण आलाच.

अवश्य वाचा – IPL 2020 : कॉमेंट्री पॅनलमध्ये संजय मांजरेकरना स्थान नाही

कोलकाता नाईट रायडर्सने रिंकूवर ८० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. वास्तविक पाहता त्याची बेस प्राईज ही २० लाख होती…परंतू स्थानिक स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेता रिंकूला संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. ज्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८० लाख मोजत रिंकूला आपल्या संघात घेतलं. याच पैश्यांमधून रिंकूने आपल्या कुटुंबावर असलेलं कर्ज फेडून टाकत, आपला मोठा भाऊ आणि बहिणीच्या लग्नाला आर्थिक मदत केली. स्थानिक क्रिकेटमध्ये रिंकून फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६० च्या सरासरीने धावा रिंकूने केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात रिंकून KKR कडून कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of rinku singh kkr player in ipl psd