रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिचा आज वाढदिवस आहे. ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणाऱया भारताच्या या पहिल्यावहिल्या जिम्नॅस्टिकपटूला संपूर्ण देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच अंतिम फेरीसाठीही तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अंतिम फेरी असल्याने अर्थात तिच्यावर दबाव असणार हे सहाजिकच, पण देशातील जनतेच्या अपेक्षांचे ओझे असल्यामुळे दीपा दबावाखाली खेळू नये यासाठी तिच्या प्रशिक्षकांनी खबरदारी म्हणून तिला अंतिम फेरीपर्यंत नजरकैदेत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दीपाचा आज २३ वा वाढदिवस असूनही तिच्या कुटुंबियांशिवाय इतर कुणीही तिला शुभेच्छा देऊ शकणार नाही.

#HappyBirthdayDipa : ऐतिहासिक कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!

रिओमध्ये तिच्या खोलीत तिच्यासह वास्तव्याला असलेली वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक म्हणजेच बिश्वेश्वर नंदी यांनी आज दीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंदी म्हणाले की, मी तिच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतले असून, केवळ तिच्या कुटुंबियांनाच दीपाशी बोलण्याची परवानगी दिली आहे. तिच्या एकाग्रतेत व्यत्यय यावा अशी माझी इच्छा नाही. वाढदिवसाचे सेलिब्रेशन पुढेही होऊ शकते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर दीपा कर्माकर प्रकाशझोतात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये अद्याप भारताला एकही पदक मिळवता आलेले नाही. १४ ऑगस्ट रोजी दीपा कर्माकरची अंतिम फेरी होणार असून, तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
जिम्नॅस्टिकमधील प्रत्येक प्रकार हा घातक असतो. कोणत्याही क्षणी दुखापत होऊ शकते, पण दीपा वॉल्टच्या ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकारात तरबेज आहे, असेही नंदी म्हणाले.