रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाज अभिनव बिंद्रा याच्याकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अवघ्या ०.५ गुणांच्या फरकामुळे अभिनवला १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्य पदक गमवावे लागले. त्यामुळे भारतीय क्रीडप्रेमींकडून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून कारकीर्दीची यशस्वी सांगता करण्याचे अभिनवचे स्वप्न होते. परंतु, त्याचे हे स्वप्न अगदी थोडक्यात हुकले. या पराभवासाठी आता कारणे देऊन फायदा नसला तरी एक गोष्ट घडली नसती तर अभिनव बिंद्रा कदाचित पदक मिळवू शकला असता. स्पर्धेला अगदी काही क्षण बाकी असतानाच अभिनवने स्वत:साठी खास तयार करवून घेतलेली रायफल तुटली. या रायफलवरच अभिनवची संपूर्ण मदार होती. अभिनवने ज्या टेबलवर रायफल ठेवली होती, ते टेबल मोडल्यामुळे रायफल खाली पडून तिचा एक भाग तुटला. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी अभिनवने याच रायफलसह संपूर्ण सराव केला होता. मात्र, ऐनवेळी पर्यायी रायफल घेऊन त्याला मैदानात उतरावे लागले. त्यामुळे अभिनवच्या कामगिरीवर काहीसा परिणाम झाला, असा खुलासा त्याचे प्रशिक्षक हाइंज रेनकेमायर यांनी ‘नवभारत टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना केला.
अरेरे..अभिनवचे पदक केवळ ०.५ गुणांनी हुकले
१० मीटर एअर रायफल प्रकाराच्या काल झालेल्या अंतिम फेरीत अभिनव बिंद्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पात्रता फेरीत ७ वे स्थान प्राप्त करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या अभिनवने पदकासाठीच्या लढतीत चांगली कामगिरी केली. अंतिम फेरी सुरू झाल्यानंतर गुणांची कमाई करत अभिनवने सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर तिसऱया स्थानासाठी अभिनव आणि युक्रेनच्या कुलीश याच्याशी गुणांची बरोबरी झाली. मग दोघांमध्ये तिसऱया स्थानासाठी शूटऑफ घेण्यात आला. यात कुलीशने १०.५ गुण कमावले, तर अभिनवला १० गुण मिळवता आले. अवघ्या ०.५ गुणांनी अभिनवचे कांस्य पदक हुकले.
भारतीय खेळाडू फक्त सेल्फी काढायला रिओला गेलेत- शोभा डे