उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. प्राचीन काळापासून भारतामध्ये ही वनस्पती आहे व तिचा आहाराबरोबरच औषधातदेखील समावेश केला आहे. ही मिरटेसी या कुळातील वनस्पती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औषधी गुणधर्म –

जांभूळ हे दीपक, पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभळामध्ये नसíगकरीत्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो.
जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे. तसेच कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. जांभळाच्या बीयांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

उपयोग –
१)
जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो त्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वाचेच आरोग्य चांगले राहण्यासाठी व जांभळाच्या औषधी गुणांचा लाभ घेण्यासाठी सर्वानीच याचा आवर्जून आस्वाद घ्यावा. जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.

२)
पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे. जांभूळ हे दीपक, पाचक असल्याने न पचलेले अन्न पचण्यास मदत होते.

३)
यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७-८ जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे उकळवावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात ३-४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.

४)
गर्भाशयाच्या बीजकेशांना सूज आल्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व निर्माण होते. अशा वेळी हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जांभूळ बी १०० ग्रॅम, मंजिष्ठा ५० ग्रॅम, कारले बी ५० ग्रॅम, अशोका चूर्ण ५० ग्रॅम व सारिवा ५० ग्रॅम या सर्वाचे चूर्ण एकत्र करून सकाळी १ चमचा व रात्री १ चमचा घ्यावे. यामुळे बीजांडकोषाची सूज (पी.सी.ओ.डी.) हा आजार आटोक्यात येतो.

५)
जांभळाचे बी व साल ही मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी १५० गॅ्रम, हळद ५० गॅ्रम, आवळा ५० गॅ्रम, ५० गॅ्रम मिरे, ५० गॅ्रम कडुिलबाची पाने व ५० ग्रॅम कारल्याच्या बिया. यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेणे. यामुळे मधुमेह हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.

नक्की वाचा >> टाचांच्या भेगांपासून ते मासिक पाळीसंदर्भातील उपचारांपर्यंत… जाणून घ्या कढीपत्त्याचे १५ हून अधिक फायदे

६)
पोटात येणारा मुरडा व अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी १ कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात.

७)
स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्वेतप्रदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभनकार्य करीत असल्याने या आजारावर गुणकारी आहे.

८)
एखाद्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होत असेल तर त्या स्त्रीला जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस द्यावा. यामुळे जीवनसत्त्व ई मिळते व त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स निर्मितीला चालना मिळाल्यामुळे व स्तंभनकार्यामुळे गर्भपात रोखला जातो.

९)
दात व हिरडय़ा कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्यात.

नक्की वाचा >> रक्त शुद्धीकरणापासून ते वजन कमी करण्यापर्यंत… बडीशेपचे ‘हे’ आठ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

१०)
मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.

११)
चरकाचार्यानी यकृतवृद्धी या आजारावर जांभळे खाण्यास सांगितले आहे. यामध्ये असणाऱ्या नसíगक आम्ल रसामुळे यकृताचे कार्य व्यवस्थित चालते.

१२)
गर्भावस्थेत जांभळे भरपूर खावीत वा त्याचे सरबत प्यावे.  यामध्ये लोह, कॅल्शिअम, क आणि ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने बाळाची वाढ चांगली होते.

१३)
आम्लपित्त अरुची हे विकार झाले असतील तर जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घेऊ न एकत्र करून एका भांडय़ामध्ये ठेवून त्याला कापडाचे झाकण लावावे व ४-५ दिवस उन्हात ठेवावे, त्यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ २ चमचे घ्यावा याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

नक्की वाचा >> कलिंगड: गरापासून ते साल आणि बियांपर्यंत सर्वकाही आरोग्यदायक; जाणून घ्या १५ फायदे

सावधानता –

१)
जांभळे ही नेहमी जेवण केल्यानंतरच खावीत. सहसा रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत.

२)
जांभळे खाल्ल्यामुळे घसा व छाती भरल्यासारखी होते व अशा वेळी जेवण जात नाही.

३)
कच्ची जांभळे खाऊ नयेत.

४)
जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली जांभळे खावीत.

डॉ. शारदा महांडुळे

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits 13 reasons why you absolutely must eat jamun fruit this summer scsg