चित्रकथी
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध तर काही नवोदित चित्रकार त्या घटनेने पुरते हबकून गेले होते. ते करायला गेले होते एक आणि समोर घटना घडलेली होती भलतीच.. तीही अंगावर शहारा आणणारी आणि आयुष्यात कधीही विसरता न येण्याजोगी. बनारसच्या घाटावर हे सर्व चित्रकार प्रत्यक्ष चित्रण करण्यासाठी म्हणून बसले होते. प्रत्येकाने आपल्याला हवा असलेला स्पॉट निवडला आणि चित्रणास सुरुवात झाली. चित्रणामध्ये ते सारे जण गर्क असतानाच अचानक मोठे बॉम्बस्फोट झाले. सर्वत्र एकच लाल भडक रक्ताचे साम्राज्य पसरले. एरवी लाल भडक रंग पाहून कधीच कोणत्या चित्रकाराला भोवळ येत नाही, पण तो प्रसंग वेगळाच होता. अनेकांच्या अंगावरील सदरा, कपडे यांच्यावर रक्ताचे शिंतोडे उडालेले, तर काहींचे कपडे रक्ताने माखले होते. असे म्हणतात की, वय झालेल्या माणसाला अशा वेळेस मृत्यूचे भय जरा अधिकच जाणवते.. त्या सर्व चित्रकारांमध्ये वयाने अधिक होते ते नाशिकचे शिवाजी तुपे सर. त्या बॉम्बस्फोटानंतर त्यांनी त्या जागेवरचे सारे चित्रसामान आवरले आणि मग ते वळले ते इतरांना धीर देण्यासाठी. त्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष असलेल्या व्यक्तींबरोबर या अनपेक्षित घटनेच्या आघाताने हबकून गेलेले चित्रकारही होते. या साऱ्यांना धीर देण्याचे काम केले ते तुपे सरांनी. या घटनेनंतर महिन्याभरातच सरांची भेट झाली त्या वेळेस ते गमतीत म्हणाले, तुम्ही पत्रकार आहात, त्यामुळे तुमच्या लेखी बातमीचे महत्त्व अधिक असते. पण अहो, एक बातमी तुम्हाला मिळता मिळता राहून गेली! मृत्यूची गाठ पडता पडता थोडक्यात हुकली! सर भेटले त्या वेळेस बनारसला त्यांच्यासोबत असलेले दोन जण तेव्हाही सोबत होते. पण घटनेची आठवणही नकोच, अशी त्यांची अवस्था होती. सरांना विचारले, तुम्ही हा प्रसंग कसा काय निभावून नेला? त्यावर सर म्हणाले होते, ‘त्या वेळेस इतरांना धीर देण्याची अधिक गरज होती. त्यांना धीर देता देता, माझाच धीर उंचावत गेला.’
..तुपे सर चित्रकार म्हणून तर दिग्गज किंवा मोठे होतेच, पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ होते. त्यांच्या माणूसपणाच्या गोष्टी सांगणारे चित्रकारच नव्हे तर रसिक आणि सामान्यजन केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही सहज भेटतील. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर व्यक्त झालेली हळहळ राज्याबाहेरही असेलच. एरवी एखादी व्यक्ती निवर्तली की, ‘मोठी पोकळी निर्माण झाली’ किंवा मग लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असेल तर ‘अवघा महाराष्ट्र हळहळला’ असे म्हणण्याची प्रथा आहे. गेल्या गुरुवारी तुपे सरांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे चित्रजगत आणि सांस्कृतिकजगत खरोखरच हळहळलेले पाहायला मिळाले. त्यामागे एक महत्त्वाचे कारण होते. यातील प्रत्येकाला आपल्या घरातीलच एक व्यक्ती गेल्याचे दुख झाले होते. राज्याबाहेरच्या काही चित्रकारांनी दुसऱ्या दिवशी बातमी कळल्यानंतर दूरध्वनीवरून संपर्क साधला त्या वेळेस त्यांच्याही बोलण्यात हीच बाब जाणवली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वागायला अतिशय साधेपणा, आपण देशातील एक मोठे चित्रकार असल्याचा बडेजाव कुठेही नाही, हळुवार बोलणे, एखाद्या चित्रातली चूक दाखवताना समोरचा विद्यार्थी असला तरीही ते अतिशय आदरपूर्वकच त्याच्याशी बोलत ती दाखवून देत. तुपे सर संवाद साधत असताना सर आणि समोरची व्यक्ती या दोघांमधील वयाचे अंतर पूर्णपणे बाजूला व्हायचे. त्यांच्या या गुणांमुळेच प्रत्येकाला ते केवळ जवळचेच नव्हे तर अगदी आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणेच वाटत. त्यामुळे सरांसाठी व्यक्त झालेली हळहळ ही घरच्या व्यक्तीसाठीची हळहळ होती. मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व हे घरातील आवडत्या आजोबांसारखे होते.
अनेक चित्रकार हे आजोबा झाले किंवा वय उतरणीला लागले की, ‘आता पूर्वीसारखे काम करायला जमत नाही’, ‘शरीर थकले आहे, ते पूर्वीसारखी साथ देत नाही’ असे सांगतात आणि बहुतांश वेळ आपल्या घरी किंवा स्टुडिओमध्येच व्यतीत करतात. तुपे सरांचा विशेष म्हणजे ते निसर्गामध्ये सतत वावरणारे, तुम्हाला कधीही, कुठेही रस्त्यावर दिसायचे. वय हा मुद्दाच नव्हता त्यांच्या लेखी. ‘या वयात एवढं सारं कसं काय जमवता? ’ असा प्रश्न कुणी विचारलाच तर ते सांगायचे, निसर्गामध्येच एवढी ऊर्जा आहे की, आपण घेऊ तेवढे कमीच. मी भरपूर िहडतो फिरतो. या फिरस्तीमध्येच ऊर्जादेखील गोळा करतो. आवश्यकतेएवढी वापरतो. अनेकदा चित्रकारांना मी सांगतो अगदी व्यायाम नका करू. पण हिंडतेफिरते राहा. तो तुमचा व्यायाम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी डोक्याचा आणि हाताच्या बोटांचा व्यायाम मात्र केलाच पाहिजे. सततची रेखाटने, रेखाचित्रे आणि चित्रे जी केवळ सराव म्हणून केलेली असतात. तोच त्यांचा खरा व्यायाम. चित्र बोटाने नाही काढले जात त्यात डोक्याचा वापर महत्त्वाचा असतो. रेखाटने करताना हाताची बोटे आणि मेंदू दोन्ही गोष्टी वापरल्या जातात आणि त्याचा व्यायाम आपसूकच होतो’.
आधी केले, मग सांगितले हा खाक्या तुपे सरांनी नेहमीच पाळला. त्यामुळेच ते इतर चित्रकारांना जे सांगायचे ते त्यांनी आधी स्वत: केलेले किंवा अमलात आणलेले असायचे. ते नेमाने सराव म्हणून रेखाटने करायचे. सोबत असलेल्या त्यांच्या शबनममध्ये नेहमीच एक रेखाटनांची वही असायची. सरांनी खिशात हात घालून एखादा चिटोरा किंवा काही काढायचा प्रयत्न केला की, त्या चिटोऱ्यावरही तुम्हाला हमखास सरांनी केलेले रेखाटनच सापडावे. हाती लागेल त्या गोष्टीचा वापर ते रेखाटनासाठी करायचे. खरेतर हल्लीच्या आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. कारण वर्गात एखादी गोष्ट करायला सांगितली की, ही मुले त्याकडे केवळ एक असाइनमेंट म्हणून किंवा गृहपाठ म्हणून पाहतात आणि मग चित्रणात जान येतच नाही. कारण ते केवळ असाइनमेंट म्हणून केलेले असते. तुपे सरांनी सराव म्हणून केलेली रेखाटनेही ते पूर्णपणे जीव ओतून करायचे आणि ती अत्युत्तम दर्जाचीच असायची.
चित्र रेखाटने, त्यांचा सराव याबाबत ते नेहमीच एक किस्सा सांगायचे. एकदा प्रसिद्ध चित्रकार आलमेलकर त्यांच्याकडे जेवायला आले होते. जेवायला बसणार, तोच आलमेलकरांना काही आठवले आणि ते म्हणाले, मी आलोच. त्यानंतर एका कागदावर त्यांनी तीन गोल काढले आणि मग ते जेवायला बसले. त्यावर तुपे सरांनी त्यांना विचारले, हा काय प्रकार आहे? त्यावर ते उत्तरले की, तीन रेखाटने झाल्याशिवाय जेवण नाही हा नेम आहे. आज काहीच केलेले नाही असे होता कामा नये, म्हणून नेम पाळला. काय केले यापेक्षा काही का असेना पण केले आणि नेम पाळला हे महत्त्वाचे आहे. बहुधा हा किस्सा तुपे सरांच्या मनात कायम कोरला गेला असावा. कारण त्यांनीही रेखाटने केलेली नाहीत, असा दिवस गेलेला नाही!
तुपे सर हा स्टुडिओतला नव्हे तर माणसांतला चित्रकार होता. तेच त्यांचे मोठे वैशिष्टय़ होते. समाजात जाऊन, एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण करणारे कलावंत कमी झाले आहेत. एकतर तेवढा सराव अलीकडच्या पिढीला नाही आणि त्यासाठी लागणारे धाडसही आता कमी झाले आहे. पूर्वी चित्रकार शेतात बसून, आडवाटेला किंवा अगदी शहरातही रस्त्यावर बसून चित्र रेखाटताना नजरेस पडायचे. मग सामान्य रसिकांच्या कुतूहलपूर्ण नजरा त्या चित्रावरून फिरायच्या आणि समोरचे दृश्य त्या चित्रात किती छान पद्धतीने आले आहे, त्यावर तिथेच चर्चा रंगायची. रसिक हे चित्रकार नसले तरी समोरच्या दृश्यातील सौंदर्यपूर्ण बाबी किती आणि कशा चित्रात उतरल्या आहेत ते त्यांना कळत असते. एखाद्या चित्रकाराला ते चित्र जमलेले नाही, असे वाटले तर ते पटकन बोलून जातात, ‘जमले नाहीए’ ते ऐकण्याचे आणि त्यानुसार स्वत:ला सुधारण्याचे धाडस ज्याच्या अंगी असते, तोच प्रत्यक्ष चित्रणाला समाजामध्ये जाऊन बसू शकतो. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण करणाऱ्यांमध्ये तुपे सर महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अग्रणी होते. ते तमाम चित्रकार आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान लोकप्रिय होते.
एखाद्या ठिकाणी त्यांना चित्र काढावेसे वाटले की, ते तिथेच बसायचे आणि मग चित्रण सुरू व्हायचे. एकदा तर ते चित्रणासाठी बसले तेव्हा लक्षात आले की, पॅलेट घरी राहिले आहे. त्याने त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी थेट बाजूच्या दगडावरच रंग ओतले आणि चित्रण सुरू केले. तो दगड त्यांच्यासाठी पॅलेट झाला. त्या दगडाचेही भाग्य काही औरच असावे त्या दिवशी, तो धन्य झाला!
प्रत्यक्ष स्थळचित्रण हा सरांचा आवडीचा विषय. संपूर्ण आयुष्यात सरांनी ३० हून अधिक प्रदर्शने केली. पण त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष चित्रणांना आणि प्रत्यक्ष चित्रण कार्यशाळांना तर गणतीच नाही, अशी स्थिती आहे. नाशिक कला निकेतनचे प्रसिद्ध चित्रकार वा. गो. कुलकर्णी आणि शिवाजी तुपे यांनीच तर देशातील पहिल्यावहिल्या ‘ऑन द स्पॉट’ चित्र स्पर्धेस तेव्हा सुरुवात केली होती. अशा प्रकारची स्पर्धा नंतर देशभरात कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. त्यानिमित्ताने नाशिककरांना अनेक प्रसिद्ध चित्रकार थेट नाशकात पाहायला मिळाले.
तुपे सरांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही ठिकाणी चित्र काढण्यासाठी बसले की, मग सुरुवातीस ते इतर चित्रकारांप्रमाणे त्या समोरच्या दृश्याकडे पाहत. अनेकांना असे वाटायचे की, ते सौंदर्यस्थळाचा शोध घेत आहेत, पण ते तसे नसायचे, त्या दृश्याशी त्यांचा संवाद नजरेनेच सुरू व्हायचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर स्मित लकेर उमटली की समजायचे आता एक हात पेन्सिल किंवा मग ब्रशच्या दिशेने जाणार आणि मग चित्र सुरू.. व्हायचेही तसेच. ते निसर्गाशी संवाद साधणारे असे चित्रकार होते, म्हणूनच तर ते तुम्हाला अगदी गिरिमित्र किंवा पक्षिमित्र संमेलनातही भेटायचे. महाराष्ट्राच्या रौप्यमहोत्सवी पक्षिमित्र संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत बोरिवली येथे त्यांना नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारावर पाहिले तेव्हा तो आश्चर्याचा धक्का नव्हता. कारण ते तिथे येणार याची खात्री होती. नजरानजर झाली तेव्हा डोळ्यांत आनंदच होता. तेही म्हणाले, ‘खात्रीच होती, आपली भेट नक्की होणार.’
खरेतर कला हा सर्व जाणिवांना व्यापून राहिलेला विषय आहे. पण अनेक कलावंतांच्या बाबतीत असे दिसते की, ते फक्त त्यांच्याच कलाप्रकारांत कार्यरत असतात. पण तुपे सरांचे असे नव्हते. ते अगदी सहज नजरेस पडायचे. ते नेहमी म्हणायचे की, चांगला कलावंत व्हायचे तर इतर कलांमधील जाणही असायलाच हवी. ते स्वत: चांगले वाचकही होते.
त्यांची विनोदबुद्धीही नेहमी ताजी टवटवीत असायची. नाशिकचेच प्रसिद्ध चित्रकार अनिल अभंगे यांनी एकदा सरांना त्यांची प्रदर्शनाची चित्रे पाहण्यासाठी बोलावले तेव्हा सर त्यांना गमतीने म्हणाले, ‘मी तर चित्रकलेशीच लग्न केले, त्यामुळे मला चित्रे जमतात, यात विशेष काहीच नाही. पण तुम्ही तर लग्न करून संसार करता तरी चांगली चित्रे कशी काय काढू शकता?’ विनोदबुद्धी शाबूत असणे, प्रसंगी स्वत:वरही विनोद करता येणे हे चांगला माणूस असण्याचेच लक्षण असते.
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत हेही तुपे सरांच्या आठवणीने भारावून जातात. ते म्हणतात.. संस्कार भारतीच्या चित्र कार्यशाळांच्या निमित्ताने त्यांच्याशी अनेकदा एकत्र येणे झाले. त्यांच्यातील श्रेष्ठ चित्रकारापेक्षा त्यांच्यातील माणूस खूप भावला. ज्या कुणाशी ते संवाद साधायचे त्या व्यक्तीमधले आणि त्यांच्यातले अंतर दुसऱ्या मिनिटाला नाहीसे व्हायचे. विद्यार्थ्यांना सांगतानाही ते आधी त्यांच्या चांगल्या बाबी सांगायचे आणि मग तो दुखावणार नाही अशा पद्धतीने चित्रणातील त्रुटी सांगायचे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ते अगदी अनेक मोठय़ा संमेलनांपर्यंत सर्वत्र तुपे सर काम करताना दिसायचे. महत्त्वाचे म्हणजे ते आयोजक असायचे. अनेक ठिकाणी आयोजक केवळ कामावर देखरेख करताना दिसतात. पण ते मात्र काम करताना दिसायचे.’
तुपे सरांच्या निधनानंतर चित्रकार अनिल अभंगे यांच्याशी बोलणे झाले, त्या वेळेस कळले की, यंदाच्या दिवाळीमध्ये सावडर्य़ाला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. तिथे जायचे होते, कारण संभाजी महाराजांना जिथे जेरबंद केले त्या कसब्यामध्ये जाऊन त्यांना तेथील गावातील घरांचे चित्रण करायचे होते. गेल्या खेपेस ते तिथे गेले तेव्हा त्यांना लक्षात आले की, शहरीकरणाच्या रेटय़ानंतरही हे गाव अद्याप बरेचसे गावच राहिले आहे. ते रेखाटण्याची, चितारण्याची त्यांची इच्छा होती. आता अभंगे तिथे जाऊन चित्रण करणार असून त्यातून साकारणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन नाशिकमध्ये करणार आहेत, सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. खरेतर नाशिकमध्ये एक चांगले कलादालन असावे, अशी सरांची तीव्र इच्छा होती. नाशिकभूषण असलेल्या कुसुमाग्रजांसोबत त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यात अनेक अडचणी आल्या. नाशिकची मंडळी कुठेही गेली की, तिथे बोलताना किंवा नाशिकचा उल्लेख करताना दोन अभिमानिबदूंचा उल्लेख करतात, पहिले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि दुसरे शिवाजी तुपे. नाशिककरांना खरोखरच याचा रास्त अभिमान असेल आणि नाशिक महापालिकेलाही तसेच खरोखर मनातून वाटत असेल तर गोदाकाठी शिवाजी तुपे सरांच्या मनातील ते सुंदर कलादालन उभे राहायला हवे. तीच सरांसाठी खरी श्रद्धांजली असेल!
माणसातला चित्रकार!
<strong><span style="color: #ff0000;">चित्रकथी</span></strong><br />महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध तर काही नवोदित चित्रकार त्या घटनेने पुरते हबकून गेले होते. ते करायला गेले होते एक आणि समोर घटना घडलेली होती भलतीच.. तीही अंगावर शहारा आणणारी आणि आयुष्यात कधीही विसरता न येण्याजोगी.
आणखी वाचा
First published on: 16-08-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human artist