युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक ठेवी १० कोटी ३६ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंनी आज वरळीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपील एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचे म्हटले आहे. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली असून आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या गाडीची एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीतून पदयात्रेला काढली. या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. दरम्यान आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे.

आणखी वाचा : आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार नाही, उद्धव ठाकरे म्हणतात…

२०१४ ला संयुक्तपणे निवडणुक लढवताना मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचाच हक्क आहे असं उद्धव यांनी सांगितले होते. या निवडणुकीत बहुमत मिळवून सेनेचा मुख्यमंत्री असेल असं उद्धव यांनी सांगितलं होतं. मात्र जनमताच्या जोरावर भाजपा राज्यात मोठा भाऊ ठरला आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर या निवडणुकीतही उद्धव यांनी एक शिवसैनिकच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसेल असा शब्द मी बाळासाहेबांना दिला आहे सांगत उद्धव यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे दावेदारी सांगितली आहे. असं असतानाच त्यांनी आपला मुलगा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता आदित्य यांच्या प्रतिज्ञापत्रामधून ठाकरे कुटुंबाची एकूण संपत्ती किती यासंदर्भात पहिल्यांदाच माहिती समोर आली आहे. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने आतापर्यंत कधीच निवडणुक लवढलेली नसल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल आतापर्यंत केवळ अंदाजच व्यक्त केला जात होता.