युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘तेजस माझ्यासारखाच आहे’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ३ ऑक्टोबर रोजी वरळी मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि धाकटा भाऊ तेजसही उपस्थित होता. बुधवारी निवडणुकीच्या सभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेही गेले होते. सत्काराच्या वेळी तेजस ठाकरेंना मंचावर आमंत्रित करण्यात आले. तेजस हे मंचावर येत असताना उपस्थित शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा देत तेजस यांचे मंचावर स्वागत केले. त्यामुळे तेजस खरोखरच सक्रिय राजकारणामध्ये येणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरे आमदार होताच तेजस होणार युवासेना प्रमुख?

याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेबांनी पहिल्यांदा सार्वजनिक मंचावरुन तेजसबद्दल केलेल्या वक्तव्याची आठवण अनेकांना झाली आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजेच १७ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचा आशिर्वाद घेऊन आदित्य ठाकरेंनी सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला. याच मेळाव्यामधील भाषणामध्ये बाळासाहेबांनी घराणेशाहीवर टीका केली होती. ‘कोण ती बाई (सोनिया गांधी)? कोण तो राहूल? कोण तो ओमर अब्दुल्ला? त्यांच्यापेक्षा आमची पिढी बरी की त्यांच्याकडे किमान विचार तरी आहेत. तुम्ही कोणाचं नेतृत्व स्वीकारता. राहुल हा नेतृत्वाच्या लायकीचा आहे का? ओमर अब्दुल्ला नेतृत्वाच्या लायकीचा आहे का? इथे बाप आहे म्हणून मुलगा असावा असं शिवसेना करणार नाही. शिवसेनेवर ठाकरे घराणं लादलं जाणार नाही. तुम्ही त्याचा स्वीकार केला तरच (ते राजकारणात येतील),’ असं बाळासाहेबांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बाळासाहेबांनी तेजस ठाकरेंचे उदाहरण दिले. ‘उद्धवचा दुसरा मुलगा तेजस कडक (आक्रमक) डोक्याचा पोरगा आहे. माझ्यासारखाच आहे. मला जी आवड आहे ती त्याला आवड आहे. मला बागकाम आवडतं अन् त्यालाही. मला माशांच काम म्हणजेच मत्स्यालय आवडतं. मी कुत्री पाळलीयत. ती आवड त्यालाही आहे,’ असं बाळासाहेब तेजस यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते. तेजस हे पर्यावरण आणि प्राण्यांमध्ये रमणारे असल्याचे सांगतानाच, ‘या वयामध्ये माझी आवड मला जोपासता येत नाही कारण वर्तमानपत्रे हुशार झालीयत. मी काही केलं तर त्यावर अग्रलेख येईल’; असा टोलाही बाळासाहेबांनी या भाषणातून लगावला होता.

नक्की वाचा >> करोडपती आदित्य… प्रथमच समोर आली ठाकरे कुटुंबातील व्यक्तीची संपत्ती

दरम्यान, तेजस हा केवळ सभा पहायला आला आहे असं उद्धव यांनी संगमनेरच्या भाषणाच्या आधीच स्पष्ट केलं होतं. तेजस हा जंगलात रमाणारा असला तरी राजकारणात कधी काहीही होऊ शकतं, असं बाळासाहेब म्हणाल्याची आठवणही उद्धव यांनी यावेळी करुन दिली.