शहाण्यांना दिसणारे जग खरे की वेड्याला जाणवणारे जग खरे, हा जसा प्रश्न. तसेच डोळस व्यक्तीला जे नजरेसमोर दिसते ते खरे की स्पर्शातून-संवेदनांमधून शोधणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीची चौकस नजर खरी? आणि त्यातही एखादी डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असेल तर.. एकमेकांत अडकलेल्या अशा चित्रविचित्र प्रश्नांची मालिकाच श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर मांडली होती. एकापाठोपाठ एक शब्दश: अंदाधुंद कारभार वाटावा अशा घटना या चित्रपटात घडतात आणि त्याचा शेवट मात्र प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. नुकतंच या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत अनेकांनाच प्रश्न पडले असतील. या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्री तब्बूने एका मुलाखतीत दिलं होतं.

‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’दरम्यान तब्बूने क्लायमॅक्सविषयी चर्चा केली. या चित्रपटाच्या शेवटामुळेच इतक्या महिन्यानंतरही त्याची चर्चा होत असल्याचं तिने यावेळी सांगितलं. प्रेक्षकांप्रमाणेच तब्बूलाही क्लायमॅक्समध्ये नेमकं काय होतं हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. मात्र दिग्दर्शक राघवन यांचा तो उलगडण्यास नकार होता.

आणखी वाचा : चित्रपटांमध्ये ‘छोटा अमिताभ’ साकारणाऱ्या या मुलाची बहीण आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री

“श्रीराम हे मला शेवट सांगूच इच्छित नव्हते. लोकांनी त्यांच्या परीने शेवट उलगडावा अशी त्यांची इच्छा होती. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्हाला दिसतं असं मला वाटतं. माझ्या मते, सिमीचा (तब्बूने साकारलेली भूमिका) मृत्यू होतो आणि आयुषमान खरंच आंधळा होतो. आता तो खरं बोलतो की नाही हे मलाही माहीत नाही,” असं तिने सांगितलं होतं.

चित्रविचित्र ससेमिऱ्यात अडकवून आपलीच गंमत आपल्याला अनुभवायला लावणारा असा हा अप्रतिम वेगळा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली होती.