‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील गॅरी म्हणून लोकप्रिय ठरलेला अभिनेता अभिजीत खांडकेकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. अभिजीतने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवलीय. सध्या अभिजीत ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ या शोचं सूत्रसंचालन करत असून चाहत्यांची त्याला मोठी पसंती मिळतेय. सोशल मीडियावर देखील अभिजीत चांगलाच सक्रिय आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसचं पत्नी अभिनेत्री सुखदासोबतचे अनेक क्षण तो शेअर करत असतो.
मात्र अभिजीतने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात त्याने एक मल्टि करल हटके जॅकेट परिधान केलंय. तर त्याला त्याने एक साईड कट असलेल्या प्लाझो पॅन्टची जोड दिलीय. या हटके लूकमुळे अभिजीत चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक नेटकऱ्यांनी अभिजीतचा हा लूक पाहून त्याची तुलना रणवीर सिंहसोबत केलीय.
View this post on Instagram
या फोटोला अभिजीतने एक सुंदर कॅप्शन दिलंय. “वर आकाश…खाली पृथ्वी आणि मधे शांती.” असं कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे. तर अभिजीतच्या या लूकवर अनेक नेटकऱ्यांनी त्याला कमेंट करत ‘मराठी रणवीर सिंह’ म्हंटलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “प्लाझो घातलाय” तर दुसरा युझर म्हणाला, ” महाराष्ट्रीयन रणवीर सिंह” आणखी एक युजर म्हणाला, “मराठीतला रणवीर सिंह”. एक नेटकरी म्हणाला, “झगा मगा सर्वांनी मला बगा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी मात्र अभिजीतच्या या लूकला पसंती दिली आहे. अभिजीत अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. त्याच्या या फोटोंना कामय पसंती मिळताना दिसते. दरम्यान, अभिजीत खांडकेकरने लोकसत्ता डिजिटल अड्डावर तो ट्रोलिंगकडे कसं पाहतो यावर खुलासा केला होता.
अभिजीत खांडकेकरचं ट्रोलिंगवर मत
या मुलाखतीत तो म्हणाला, “आम्ही काही नाही केलं तरी ट्रोल होत असतो. त्यामुळे मला तरी वाटतं की काही तरी करुन तरी ट्रोल व्हावं. आपल्याला फुकटचा डेटा मिळालाय आणि आपण काही तरी वेगळी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम अनेक लोकं करत असतात. मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे काम करावं, मी माझं काम करत राहीन. फक्त जर कुणी अश्लिल भाषेमध्ये, स्त्रीयांना अपमानास्पद असेल असे काही टाकत असेल तर मी ते कधीच खपून घेत नाही. मी ते आधी डिलिट करतो’ असे अभिजीत म्हणाला.