बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. मात्र ते कोणत्या चित्रपटासाठी नसून ‘कौन बनेगा करोडपती’च्या विशेष भागासाठी एकत्र काम करणार आहेत. २८ ऑगस्ट म्हणजेच सोमवारपासून सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘केबीसी’ या रिअॅलिटी शोच्या नवव्या सिझनमध्ये ज्युनिअर बच्चन त्याच्या प्रो कबड्डी टीम जयपूर पिंक पँथर्ससोबत झळकणार आहे. शनिवारीच या विशेष भागाची शूटिंग झाली असून लवकरच तो प्रसारित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

रिअॅलिटी शो म्हटलं तर त्यामध्ये प्रमोशनसाठी एखाद्या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावणं साहजिक आहे. मात्र केबीसीमध्ये कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार येणार नसल्याचं शोच्या निर्मात्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं. त्याऐवजी शोमध्ये रिअल लाइफ हिरो येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती. शोच्या नवीन प्रोमोमध्ये विशेष अतिथी म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू मिताली राज, झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर यांची झलक पाहायला मिळाली. त्यामागोमागच आता प्रो कबड्डी टीम जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चन टीममधील कबड्डीपटूंसोबत शोमध्ये झळकणार आहे. त्यासोबतच अभिषेक बच्चन हॉटसीटवर बसून बिग बींच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसणार आहे. यापूर्वी केबीसी चौथ्या आणि आठव्या सिझनमध्येही अभिषेकने हजेरी लावली होती.

Mumbai rains: महेश भट्ट, आर. माधवन यांच्याही गाड्या पावसात अडकलेल्या

या विशेष भागात हे कबड्डीपटू त्यांच्या खेळाविषयी आणि अनुभवाविषयी सांगताना दिसतील. तीन वर्षांनंतर केबीसीचा नववा सीझन काही नवीन बदलांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ‘लाइफलाइन जोडीदार’, ‘व्हिडिओ अ फ्रेंड’, ‘जॅकपॉट प्रश्न’ हे नवीन बदल आहेत.