क्रिकेटला भारतात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. त्यातही काही खेळाडूंसाठी क्रीडारसिकांमध्ये असणारं वेड पाहता त्यांच्या फॅनहूडची प्रशंसा करावी तेवढी कमीच. अशाच काही चाहत्यांपैकी एक म्हणजे सुधीर कुमार. ‘सिर्फ नाम ही काफी है..’ ही ओळ सुधीर कुमार गौतमला पूर्णपणे लागू होते असं म्हणायला हरकत नाही. एव्हाना तुम्हालाही सुधीर कुमार कोण हे लक्षात आलंच असेल. भारताच्या कोणत्याही क्रिकेट सामन्यामध्ये तिरंग्याने रंगून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव लिहून आणि भलामोठा झेंडा हातात घेऊन सुधीर कुमार भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतात.

अशा या ‘जबरा फॅन’ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता अभिलाश थपलियाल पुढे सरसावला आहे. जगाच्या पाठीवर भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याही सामन्याला हजेरी लावता यावी यासाठी अभिलाश थपलियालने एक वेबसाइट सुरु केली आहे. सुधीर यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या संकेतस्थळाद्वारे देणगी देता येणं सहज शक्य होणार आहे.

अभिलाशने सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमाला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. याविषयी सांगताना अभिलाश म्हणाला, ‘हा उपक्रम नुकताच सुरु झाला आहे. खरं सांगायचं तर आम्ही इतकी रक्कम उभी करु शकत नव्हतो. त्यामुळे इतरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरु असणाऱ्या चॅम्पियन्स करंडकालाही सुधीरची उपस्थिती असणार आहे. पण, प्रश्न एका करंडकाचा किंवा फक्त एका सामन्याचा नाहीये. तर, आपला संघ ज्या ज्या ठिकाणी खेळेल त्या सर्व ठिकाणी सुधीर यांनी असलंच पाहिजे. त्याकरता आपण त्यांची (सुधीरची) मदत करणं अपेक्षित आहे.’

sudhir-and-abhilash

वाचा: बिग बींच्या या सुपरहिट चित्रपटाची जया यांनी लिहिली होती कथा

अभिलाशने राबवलेला हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुधीर यांच्या शरीरावर रंगवण्यात येणारा तिरंगा हीच त्यांची ओळख आहे. आपण, सामन्याला गेल्यावर फक्त फोटो काढतो आणि तो विषय आपल्यासाठी तिथेच संपलेला असतो. हा मुद्दा अधोरेखित करत अभिलाशने सुधीर यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटिझन्समध्ये अभिलाश बराच प्रसिद्ध आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि राजकारण्यांवर उपरोधिक भाष्य करणारे ‘मफलर मॅन’सारखे कार्यक्रमही बरेच चर्चेत असतात. तो लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे.