चित्रपटांपेक्षा नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कोयना मित्राने तिच्या एका मैत्रिणीलाच २२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर समोर आलं आहे. दिवाणी न्यायालयाने कोयनाला मैत्रिणीचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. २०१२-१३ मध्ये कोयनाने तिची मैत्रीण पूनम सेठी हिच्याकडून २२ लाख रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कोयनाने चार धनादेश तिला दिले होते, मात्र ते वठले नाहीत. आता ९ टक्के व्याजासह कोयनाला ही रक्कम परत करावी लागणार आहे.

मार्च २०१६ मध्ये या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या काळाचा व्याज पकडून मैत्रिणीचे २२ लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेकदा समन्स बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहिल्याने या सर्व आरोपांवर कोयनाची बाजू न ऐकून घेताच हा निर्णय देण्यात आला.

VIDEO : जेव्हा ट्रिपल एच म्हणतो ‘रिश्ते में तो हम तुम्हारे…’

तक्रारकर्ता पूनम सेठीच्या माहितीनुसार, जुलै २०१२ मध्ये कोयनाने तिच्याकडे १० लाख रुपये उधार मागितले होते. मात्र त्यावेळी सेठीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिने फक्त ५ लाख रुपये कोयनाला दिले होते. त्यानंतर कोयनाने वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले. कधी सहा लाख, तीन लाख, तर कधी नऊ लाख रुपये असे मिळून २२ लाख रुपये पूनमकडून घेतले. पुढे पूनमने जेव्हा कोयनाला पैसे परत मागितले तेव्हा तिने तिला २२ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश न वठल्याने दोघींमधील वाद वाढत गेला.

वाचा : ‘तुमच्या यशाला समजून घेणारा जोडीदार मिळणं कठीण’

पूनमने तिच्याकडे पैसे परत मागितले तर प्रत्येकवेळी कोयना काही ना काही बहाणे सांगून तिला टाळत असे. अखेर कायदेशीर पद्धतीने हे प्रकरण मिटवण्याचा निर्णय पूनमने घेतला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. कोयना गेल्या काही काळापासून पडद्यावर झळकली नाही. तिच्याकडे एकही प्रोजेक्ट नसल्याने ती सध्या कामाच्या शोधात आहे. अशात कोयना पूनमचे पैसे कसे देणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.