अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही विविध चित्रपटांच्या माध्यमातून मात्र त्यांचं अस्तित्व आजही आपल्यात आहे. अभिनय आणि सौंदर्य याचं सुरेख समीकरण असलेल्या या अभिनेत्रीच्या आठवणींच्याच बळावर आता त्यांचा जीनप्रवास एका माहितीपटाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार असल्याचं वृत्त ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलं आहे.

सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांचे पती, बोनी कपूर यांनी हा माहितीपट साकारण्यासाठी पुढाकार घेतला असून, यामध्ये श्रीदेवी यांचा आवाज आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील काही व्हिडिओही वारपण्यात येणार आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी, त्या व्यक्तीच्या जीवनप्रवासाविषयीची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपटाची संकल्पना अचूक असल्याचं जाणत बोनी कपूर यांनी हा निर्णय घेतला आहे. माहितीपटाची जबाबदारी ते शेखर कपूर यांच्यावर सोपवणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘चांदनी’चा प्रवास माहितीपटातून उलगडल्यास चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मासुद्धा श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी पुढाकार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पटकथा तयार होताच तो या चित्रपटाची घोषणा करेल अशी चिन्हंही होती. पण, त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

श्रीदेवी यांच्या जाण्यानंतर कलाविश्वात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनानंतर आता काही दिवस उलटले असले तरीही या आघाताचा विसर मात्र कोणालाही पडलेला नाही. खुद्द कपूर कुटुंबीयसुद्धा या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या आयुष्याची घडी पुन्हा बसवत असल्याचं पाहायला मिळत आहे.