बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओत आदित्य एका एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत होता. त्याच्या या उद्धट वागण्यावरून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली, काहींनी टीकाही केली. त्यानंतर आता आदित्यच्या कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने त्याच्यासंदर्भात केलेल्या एका ट्विटने सर्वांचंच लक्ष वेधलंय.

मिठीबाई कॉलेजच्या श्रुती वोझाला या विद्यार्थिनीने आदित्यचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विट केलं की, ‘मला आठवतंय, कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षकाशी गैरवर्तन केल्याने त्याला एका आठवड्यासाठी कॉलेजमधून निलंबित करण्यात आलं होतं. जुन्या सवयी लवकर बदलत नाहीत.’ आदित्यच्या निलंबनाची नोटीस कॉलेजच्या नोटीसबोर्डवर लावण्यात आल्याने हे समजल्याचंही तिने पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं.

ठरावीक वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या आदित्यला विमानतळावर एका कर्मचाऱ्याने रोखलं होतं. त्याला अधिक सामानासाठी अतिरिक्त पैसे देण्यास सांगण्यात आल्यामुळे आदित्यचा पारा चढला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला सर्वांसमोर ओरडण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला.

PHOTOS : दिशा-टायगरच्या लंच डेटवर ‘ती’ पोहोचली आणि…

दरम्यान, या सर्व प्रकरणावर आदित्यचे वडील उदित नारायण यांनी त्याची पाठराखण केली आहे. ‘लहानपणापासूनच तो एक चांगला मुलगा आहे आणि त्याने चांगली कामं केली आहेत. एअरपोर्टवर त्यांच्यामध्ये कशावरून वाद झाला हे मला माहित नाही. टेलिव्हिजनवर व्हिडिओ पाहिल्यावर मला हे प्रकरण समजलं. माझं अद्याप त्याच्याशी काहीच बोलणं झालं नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिली आहे.