‘पद्मावती’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना विरोधाला सामोरे जावे लागतेय. चित्रपटाला होणारा विरोध पाहता भन्साळी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्तोढगड येथे मोठ्या प्रमाणात होणारा विरोध लक्षात घेता त्यांनी चित्रपटाचा विमा काढला आहे.

वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटामागील शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. करणी सेना, जय राजपूताना संघटना, सर्व ब्राह्मण महासभा तसेच भाजपचाही चित्रपटाला विरोध आहे. विरोधकांमुळे चित्रपटाला मोठे नुकसान होऊ नये यासाठी भन्साळी यांनी तब्बल १६० कोटी रुपयांचा विमा काढला आहे.

विमा पॉलिसीनुसार, चित्रपट तिकिटांच्या विक्रीवेळी कोणत्याही प्रकारचा विरोध, संप, भांडण किंवा तोडफोड यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करेल. ‘चित्रपटाला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विरोधामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळण्याची जोखीम उचलणार नाहीत. त्याचा संपूर्ण फटका चित्रपटाच्या कमाईवर होईल’, असे ‘पद्मावती’च्या कार्यकारी संचालकाने सांगितले.

वाचा : ड्रायव्हरला १२ लाखांची गाडी गिफ्ट करणाऱ्या अनुष्काची संपत्ती माहितीये?

‘पद्मावती’च्या वितरणासाठी राजस्थानमधील वितरक ठरवण्यात आले आहेत. मात्र, जयपूरमध्ये चित्रपटगृहांच्या मालकांना अद्याप विरोधकांकडून धमक्या येत आहेत. दुसरीकडे, सेन्सॉर बोर्ड या दोन्ही पक्षांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी भन्साळी यांच्या ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटांनाही विरोध झाला होता.