शाहरुख खानला एक रोमॅण्टिक स्टार मानलं जातं. जगभरात त्याला रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. प्रेम, रोमान्स याबाबतीत तर त्याच्या सिनेमांचीच उदाहरणं दिली जातात. पण असं असलं तरी स्वतः शाहरुखला मात्र तो एका गोष्टीत कमीच वाटतो. अशी एक गोष्ट आहे जी त्याला आजही नीट जमत नाही. त्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे की, जेव्हा त्याच्या हातात काम नसतं तेव्हा त्याला गिटार वाजवत बसायचं आहे. हातात गिटार घेऊन प्रत्येक वयातील मुलीला खास भेटावं आणि तिच्यासाठी गाणं म्हणावं असंही त्याला वाटतं.

अभिनेत्री नाही तर कॉमेडियन बनून नाव कमवतेय जॉनी लिवरची मुलगी

तो आपल्या सिनेमातलं कोणतंही गाणं गायला तयार आहे. शाहरुख नेहमीच म्हणतो की, तो कुठेही उभा राहून कोणत्याही महिलेसाठी गाणं गाऊ शकतो. त्याचं हे स्वप्नच आहे म्हणा ना… आतापर्यंत संगीतात स्वतःसाठी काही करु शकलो नसल्याची खंत त्याला अनेक वर्षांपासून सतावत आहे. त्याने अनेकवेळा गिटार शिकण्याचा प्रयत्नही केला पण त्याच्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळालं नाही. शाहरुखचं हे स्वप्न मात्र त्याच्या मुलाने म्हणजे आर्यनने पूर्ण केलं असंच म्हणावं लागेल. कारण आर्यनला फार सुंदर गिटार वाजवता येतं. आर्यनला गिटार वाजवताना बघून शाहरुखला फार आनंद होतो. जे आपण नाही करू शकलो ते मुलगा करतोय हे पाहण्यातच तो स्वतःला धन्य मानतो. आर्यनला स्वतःला संगीतात रुची आहे. ते दोघं अनेकदा एकत्र संगीत ऐकतात आणि त्यावर गप्पाही मारतात.

शाहरुखने याआधी अनेक मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, तो नेहमीच कुटुंबातील महिलांसोबत भावनिकरित्या अधिक बांधला गेलेला आहे.  मग ती आई, बहिण, बायको, मुलगी कोणीही असो.. प्रत्येकीशी त्याचं जवळचं नातं आहे. या सगळ्यातही तो सर्वात जास्त जवळ कोणाच्या असेल तर ती त्याची मावशी.

सरोगसीद्वारे कृष्णा अभिषेक-कश्मीरा शहा झाले जुळ्या मुलांचे पालक

शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमातून तो अनुष्का शर्मासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाझ अली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखने एका वाटाड्याची भूमिका निभावली आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या टीमने तीन मिनी ट्रेलर्स प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये शाहरुखला ‘हॅरी’च्या तर अनुष्का शर्माला ‘सेजल’ या गुजराती मुलीच्या रुपात समोर आणण्यात आले आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.