‘बाहुबली’ सिनेमातील राजमाता शिवगामी देवीच्या व्यक्तीरेखेमुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रम्या कृष्णन आज ४७ वर्षांची झाली. रम्याचा जन्म १५ सप्टेंबर १९७० मध्ये चेन्नई येथे झाला. तिने १२ जून २००३ मध्ये तेलगु दिग्दर्शक कृष्णा वामसी याच्याशी विवाह केलेल्या रम्याने १३ फेब्रुवारी २००४ मध्ये मुलाला जन्म दिला. तिचा मुलगा ऋत्विक आता १३ वर्षांचा आहे. ‘बाहुबली २’ सिनेमासाठी रम्याने २.५ कोटी रुपये एवढे मानधन घेतले होते. तिच्या विषयीची अधिकाधीक माहिती जाणून घेण्यासाठी तिचे  चाहते नेहमीच उत्सुक असतात. तिच्याकडे साधारण ३२ कोटींची मालमत्ता असून तिच्याकडे सव्वा कोटी रुपयांची गाडी आहे.

Happy birthday Ramya Krishnan: जाणून घ्या शिवगामी देवीच्या काही अजरामर भूमिका

रम्याकडे मर्सिडीज बेंझ एस ३५० ही गाडी आहे. या गाडीची किंमत साधारणपणे १ कोटी २० लाख रुपये इतकीआहे. सध्या ती आपल्या कुटुंबियांसोबत चेन्नई येथील इंजमबक्कम येथे तिच्या बंगल्यात राहते. २०१२ मध्ये याच घरातून तिच्या मोलकरणीने सुमारे १० लाखांचे दागिने चोरले होते.

रम्याला असा मिळाला ‘बाहुबली’-
बाहुबली सिनेमात शिवगामी देवीच्या व्यक्तिरेखेसाठी आधी श्रीदेवीला विचारण्यात आले होते. पण श्रीदेवीने या भूमिकेसाठी ६ कोटी रुपये एवढे मानधन मागितले. एवढेच नाही तर श्रीदेवीने पंचतारांकीत हॉटेलमध्ये संपूर्ण मजला तिच्यासाठी बुक करण्यासोबतच मुंबई ते हैद्रबाद विमानाच्या प्रवासात बिझनेस क्लासची मागणी केली होती.

आधीच ‘बाहुबली’चे बजेट गरजेपेक्षा जास्त झाल्यामुळे निर्मात्यांना अजून खर्च करायचा नव्हता. म्हणून दिग्दर्शक राजामौली यांनी रम्याकडे या भूमिकेविषयी चर्चा करण्यास सुरूवात केली. अखेर रम्या या भूमिकेसाठी तयार झाली आणि तिने या भूमिकेसाठी २.५ कोटी रुपये मानधन घेतले होते.

संहिता ऐकताना झोपायची रम्या-
काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रम्या म्हणाली की, बाहुबली सिनेमामुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच किंवा देशभरातच नाही तर परदेशातही तिला स्वतःची ओळख मिळाली.

या सिनेमासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या मीटिंगबद्दल बोलताना रम्या म्हणाली की, या सिनेमाचे सर्व श्रेय राजामौली यांचेच आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मला सिनेमाची कथा ऐकवली. ती ऐकून माझ्या अंगावर काटेच उभे राहिले होते. मी तेव्हापासूनच स्वतःला महाराणी शिवगामी देवी समजायला लागले होते. अनेकदा सिनेमाची कथा कोणी ऐकवत असेल तर मला झोप येते. पण पहिल्यांदा असे झाले की मी राजामौली कथा सांगत असताना मी २ तास फक्त ऐकत होते. प्रत्येक सीन खूप स्पष्ट होता. ते सांगत असताना मी एखादा व्हिडिओच पाहतेय असं मला वाटत होतं. असा दिग्दर्शक असेल तर कलाकारांचे काम खूप सोपे होऊन जाते. या सिनेमासाठी मी काही खास तयारी केली नाही. या व्यक्तिरेखेसाठी मीच योग्य आहे हे मला जाणवले आणि मी शिवगामी झाले. जसे मी शिवगामीचे कपडे आणि दागिने घालायचे माझ्यातला बदल मला स्पष्ट जाणवायचा.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रम्याने शाहरुख खानसोबत ‘चाहत’ सिनेमात काम केले आहे. शाहरुखशिवाय रम्याने नाना पाटेकर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर या बॉलिवूड कलाकारांसोबतही स्क्रिन शेअर केली आहे. या स्टार्ससोबतच्या बॉलिवूडपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून रम्या सिनेसृष्टीत काम करत आहे. १९८४ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ‘नेरम पुलारुमबोल’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.  त्यानंतर १९८५ मध्ये आलेला ‘वेल्लई मनसु’ या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. आतापर्यंत रम्याने तामिळ, तेलगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा भाषांमध्ये २०० हून अधिक सिनेमांत अभिनय केला आहे.