कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिंबाचिया यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या नात्याला एक नवे वळण देण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच भारतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत हर्षसोबत आपला रोका झाल्याचे सांगितले. ‘हे काही संस्मरणीय क्षण आहेत’, असे म्हणत तिने त्या फोटोला कॅप्शनही दिले होते. आता हे प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाले असून, येत्या डिसेंबरमध्ये ते लग्न करतील. नुकतेच त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूटही केले.

वाचा : … म्हणून एकता कपूर सनी लिओनीवर नाराज

हर्ष लिंबाचिया, भारतीच्या टेलिव्हिजन शोसाठी लेखन करतो. या दोघांमुळे आता टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी कपल्सच्या नावांच्या यादीत आणखी एका जोडप्याच्या नावाचा समावेश झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही कॉमेडियन तिच्या लग्नाची तारीख कधी ठरवते याबद्दलच चाहत्यांमध्ये उत्सुकताही पाहायला मिळतेय. ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भारती म्हणाली की, ‘सर्वसामान्य मुलींप्रमाणे माझेही मोठ्या थाटामाटात लग्न व्हावे असे मला वाटते. लग्नामध्ये मेहंदी, संगीत यांसारख्या ज्या विधी केल्या जाणार त्यासाठी मी जास्तच उत्साही आहे. आम्ही लग्नासाठी ३० नोव्हेंबर, ३ आणि ६ डिसेंबर या तीन तारखा सध्या काढल्या आहेत. यापैकी एक तारीख आम्ही निश्चित करू. आमचे संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळी यांना सोयीस्कर अशी तारीख ठरवण्यात येईल. जेणेकरून, सर्वच आमच्या लग्नाला उपस्थित राहतील.’ इतकेच नव्हे तर भारतीने लग्नाला लाल किंवा गुलाबी रंगाचा लेहेंगा घालण्याचे ठरवले असून, हर्ष तिला तो घेऊन देईल.

वाचा : मल्टिप्लेक्सच्या आडमुठेपणामुळे ‘या’ निर्मात्यांची उद्धव ठाकरेंकडे धाव

‘हर्ष हा खूप साधा आहे. त्याला लग्नांमध्ये होणारा आवाज अजिबात आवडत नाही. साध्या पद्धतीने लग्न करण्यावर त्याचा विश्वास आहे. पण माझा स्वभाव मात्र पूर्ण विरुद्ध आहे. मला या सगळ्या गोष्टी फार आवडतात. शेवटी माझे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही कारण मी त्याची होणारी बायको आहे’, असेही ती एकदा म्हणालेली.