टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम आणि बॉलीवूड चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पंकज शर्मा उर्फ बॉबी डार्लिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळमधील रमणीक शर्मा या व्यावसायिकाशी लग्न केले होते. बॉबीने लग्नानंतर आपले नाव बदलून पाखी शर्मा असे ठेवले होते. मात्र, आता तिचे वैवाहिक जीवन अस्थिर झाले आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बॉबीने दिल्ली पोलिसांकडे पतीविरोधात घरगुती हिंसाचार आणि अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली आहे. ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना बॉबी म्हणाली की, ‘रमणीक मला दारु पिऊन मारायचा आणि दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचे खोटे आरोप करायचा. त्याने माझी सर्व प्रॉपर्टी आणि पैसे बळकावले होते. तसेच माझ्या मुंबईतील घरावरही त्याला हक्क हवा होता.’

सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार सिनेमे

बॉबी पुढे म्हणाली की, ‘लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याने माझ्या पैशांनी एका एसयुव्ही गाडी खरेदी केली होती. आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. एवढेच नाही तर रमणीक पैसे देऊन इमारतीच्या वॉचमनला माझ्यावर नजर ठेवायला सांगायचा. तो वॉचमन त्याला माझ्या प्रत्येक हालचालींबद्दल सांगायचा. मी कुठे जाते आणि कोणाशी बोलते यावरही रमणीक लक्ष ठेवून असायचा. त्यानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, माझ्या पैशाने घेतलेली गाडी आणि मालमत्ता परत दिली तरच मी घटस्फोट देईन, अशी अट मी घातली होती. मात्र, त्याने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर रमणीकने मला अनेकदा मारहाण केली. माझी बरीचशी संपत्ती त्याच्या नावावर आहे. मला आता माझी सर्व मालमत्ता परत हवीये. ही मालमत्ता विकून मला मुंबईत परतायचं आहे, असे बॉबीने सांगितले.

बॉबीने तिचे वास्तव्य असणाऱ्या भोपाळऐवजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भोपाळमध्ये नवऱ्याच्या अनेक ओळखी असल्यामुळे तेथील पोलिसांनी तिला मदत केली नसती. रमणीक मोबाइल दुरुस्त करण्यासाठी बाहेर गेला असताना बॉबीने राहत्या घरातून पळ काढला. पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या घरातल्यांना रमणीक त्रास देईल, अशी धमकी तो सतत द्यायचा.

पण रमणीकने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘बॉबी सगळं खोटं बोलतेय. ती माझ्या प्रॉपर्टीचे कागद, सोनं आणि पैसे घेऊन पळाली आहे. त्यामुळेच तिच्याविरोधात आम्ही एफआयआर दाखल केली. ती माझ्या पैशांच्या मागे आहे. तिच्यावर कधीच हात उचलला नाही. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेलो. ती माझ्याशी खोटं बोलली की, ती आई होऊ शकते. पण जेव्हा मला सत्य कळले तेव्हा मी तिला मुलं दत्तक घेण्याबद्दल किंवा आयवीएफच्या मदतीने मुलाला जन्माला द्यायचा पर्याय सुचवला. पण तिला मुलं सांभाळण्याची जबाबदारीच घ्यायची नाहीये, असे रमणीकने सांगितले.

Story img Loader