‘नमश्कार देवीयों और सज्जनो…’ असं म्हणत प्रेक्षकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करणारे बिग बी पुन्हा एकदा त्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. टेलिव्हिजन विश्वात नावाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांनी टेलिव्हिजन विश्वात पुन्हा दणक्यात एण्ट्री केलीये. काही दिवसांपूर्वीच ‘केबीसी’च्या ९ व्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली. ‘केबीसी’च्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन कोणी दुसराच अभिनेता किंवा अभिनेत्री करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, बिग बी इतरांच्या तुलनेत नेहमीप्रमाणे उजवे ठरले, असंच म्हणावं लागेल.

अनेकांना करोडपती होण्याची स्वप्नं दाखवणाऱ्या आणि कित्येकांच्या स्वप्नांना नवी प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमासाठी बिग बींना किती मानधन मिळतं हासुद्धा एक कुतूहलाचा प्रश्न आहे. या कार्यक्रमाच्या एका भागासाठी बिग बींना किती मानधन मिळतं माहितीये का? कोणत्याही कलाकाराची लोकप्रियता आणि कार्यक्रम सादर करण्याची त्याची हातोटी या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मानधनाचा आकडा ठरवला जातो. बच्चन यांच्याविषयी सांगावं तर, त्यांना ‘केबीसी’च्या प्रत्येक भागासाठी सध्या २.७५ ते ३ कोटी रुपये इतकं मानधन मिळत असल्याचं म्हटलं जातंय. याआधी याच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी त्यांना २ कोटी रुपये इतकं मानधन मिळत होतं. पण, आता मात्र मानधनाची गणितं बदलली असून या आकड्यात वाढ केल्यानंतरच त्यांनी हा शो स्वीकारला होता.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

येत्या काही दिवसांमध्ये बिग बींच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला मिळणारी पसंती पाहता बऱ्याच प्रसिद्ध मालिकांनाही या कार्यक्रमाने मागे टाकलं आहे.

(वरील मजकूर काही वेबसाइट्सवरील उपलब्ध माहितीच्या आधारे घेण्यात आला असून लोकसत्ता ऑनलाइनने याबाबत खातरजमा केलेली नाही.)