हिंदी चित्रपटसृष्टीत १९७५ मध्ये एका नव्या चित्रपटाने या कलाविश्वात नव्या विक्रमांना सादच घातली होती. या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यामागे काही किस्से आणि आठवणी आहेत. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये बऱ्याच कलाकारांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि जया बच्चन या कलाकारांची झलक या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. त्या काळच्या आघाडीच्या कलाकारांना सोबत घेऊन सिप्पी यांनी एक प्रकारचं शिवधनुष्यच पेललं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतकी वर्षे उलटूनही आजसुद्धा शोलेविषयीचे बरेच किस्से सांगून गप्पांचे फड रंगवले जातात. अशापैकीच एक किस्सा बऱ्याचजणांना ठाऊकही नसेल.

हा किस्सा आहे अभिनेते धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्याबाबतचा. शोलेचे संवाद आणि त्यातील दृश्य पडद्यावर पाहताना जितकी प्रभावी वाटतात तितकेच या चित्रपटाशी निगडीच किस्सेही फार रंजक आहेत. असं म्हणतात की, ‘शोले’मध्ये धर्मेंद्र ठाकूरची भूमिका साकारणार होते. त्यामागचं कारणही तसंच होतं. त्या दिवसांमध्ये हेमा मालिनी यांच्या नावाभोवती एक वलय तयार झालं होतं. या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर अनेकजण भाळले होते. त्यामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतच आणखी एका नावाचाही समावेश आहे. ते नाव म्हणजे अभिनेता संजीव कुमार.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

‘शोले’मध्ये संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका साकारली हे तर खरं. पण, ती भूमिका आधी धर्मेंद्र साकारणार होते आणि वीरुची भूमिका संजीव कुमार साकारणार होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीच संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला प्रपोज केलं होतं. हे सर्व ज्यावेळी धर्मेंद्र यांना कळलं तेव्हा त्यांनी लगेचच वीरुची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. हा किस्सा अनेकांना ठाऊकही नाहीये. असो, धर्मेंद्र आणि हेमाजींची केमिस्ट्री ‘शोले’मध्येही पाहायला मिळाली होती. ‘शोले’ हा चित्रपट त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यालाही कलाटणी देऊन गेला असं म्हणायला हरकत नाही. सिप्पींच्या चित्रपटापासून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा : …हे आहेत बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्शिअल कपल्स’