शनिवारी मुंबईतील आर. के. स्टुडिओला आग लागली आणि अनेकांच्याच मनाला ही घटना चटका लावून गेली. आर. के. बॅनर अंतर्गत साकारलेल्या आणि इतरही बऱ्याच चित्रपटांच्या चित्रीकरणाचे किस्से, कलाकारांचे अनुभव, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा एखाद्या सेलिब्रिटीचा प्रवास आणि चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान मिळवणारी ही वास्तू आगीच्या एका ठिणगीने भस्म झाली. शनिवारी आर. के. स्टुडिओमधील पहिल्या क्रमांकाच्या स्टुडिओला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यातही आली. पण, त्याचा दाह अद्यापही कायम आहे.

चित्रपटविश्वात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या वास्तूत अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यामुळे कलाकारांनाही फार दु:ख झालं. किंबहुना यामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं असल्याचं मत खुद्द ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीत मांडलं. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत कपूर यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं. “राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात वापरलेला ‘तो’ प्रसिद्ध मुखवटा, आर. के. बॅनर अंतर्गत साकारलेल्या चित्रपटातील कपडे, ट्रंकमध्ये ठेवलेल्या बऱ्याच वस्तू सर्वकाही नष्ट झालं. त्यातील काही वस्तूंवर तर त्याविषयीची माहितीसुद्धा लिहिण्यात आली होती”, असं ते म्हणाले.

राज कपूर यांनी त्यांच्या बॅनरअंतर्गत साकारलेल्या चित्रपटांमधील बरेच कपडेसुद्धा संग्रही ठेवले होते. पण, या आगीत तेसुद्धा नष्ट झाले. “नर्गिसपासून ते ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत ‘आर. के.’च्या बऱ्याच अभिनेत्रींनी वापरलेले कपडे नष्ट झाले. ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटात अभिनेत्री पद्मिनीने वापरलेली आभूषणंही नष्ट झाली. त्यासोबत चित्रीकरणादरम्यान वापरण्यात आलेल्या बऱ्याच गोष्टींचंही नुकसान झालं. हे सर्व आमच्यासाठी अमुल्य होतं. हा एक प्रकारचा ठेवाच होता, प्रेमाचा वारसा होता…”, असंही ते म्हणाले.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

आर. के. स्टुडिओ या नावाभोवती असलेलं वलय आणि स्टुडिओचं अशा प्रकारे झालेलं नुकसान आम्ही भरुन काढू. पण त्या आठवणींचं काय, असा प्रश्नही कपूर यांनी केला. ‘माझे भाऊ आणि मी, आम्ही पुन्हा इथे चार भिंती, एक छत असलेली वास्तू उभी करु. पण, त्या सर्व आठवणींचं काय? त्या कधीच परतणार नाहीत. असंख्य चित्रपट, त्यातही आमच्या बॅनरअंतर्गत साकारलेले चित्रपट, आर. के. मधील चित्रीकरणाच्या आठवणी कधीच परत येणार नाहीत. हे फक्त आमच्याच कुटुंबाचं नुकसान नसून, संपूर्ण चित्रपटसृष्टीचं नुकसान आहे”, असंही ते म्हणाले. यावेळी ते फार भावूक झाले होते.

आर. के. स्टुडिओला आग लागून इतक्या मोठ्या प्रमाणावर या वास्तूचं नुकसान झाल्याचं कळताच अनेक चाहत्यांनाही फारच दु:ख झालं. अभिनेता रणबीर कपूरही मुंबईत परतला तेव्हा त्याने थेट स्टुडिओच्या दिशेने धाव घेतली. संजय दत्तच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या रणबीरने ही बातमी कळतात थेट मुंबईची वाट धरली.