दबंग खान, भाईजान अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सध्या अतिशय भावूक झाला असल्याचं त्याचं ट्विट पाहून लक्षात येत आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमानला काही दिवसांपूर्वी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं आणि शनिवारी तो जामिनावर सुटला. या काळात चाहत्यांनी त्याच्यासाठी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत त्याने ट्विट केलं आहे.
‘सदैव माझी साथ देणाऱ्या आणि ज्यांनी कधीच आशा सोडली नाही, अशा सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद,’ असं ट्विट सलमानने केलं. सलमानच्या जामीनासाठी होणाऱ्या सुनावणीच्या दिवशी सकाळपासून मुंबईतील त्याच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. ज्या क्षणी त्याला जामीन मंजूर झाला तेव्हा चाहत्यांनी एकच जल्लोष केला. विविध शहरांतून आलेल्या चाहत्यांनी ढोल-ताशांचा गजरही केला. इतकंच नव्हे तर तो जोधपूर कारागृहातून मुंबईत येईपर्यंत चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर थांबले होते. त्यांच्या याच प्रेमाबद्दल सलमानने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले.
Tears of gratitude . To all my loved ones who are with me and never lost hope . Thank you for being there with all the love and support . God Bless .
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 9, 2018
वाचा : ही अभिनेत्री ठरली पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी
जवळपास २० वर्षांपूर्वी केलेल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवलं. न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड सुनावला होता. त्यानंतर शनिवारी दोन अटी ठेवत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सलमानला जामीन मंजूर केला.