चित्रपटसृष्टीत एखादा कलाकार लोकप्रिय झाल्यावर इतर काही कलाकारांसोबत त्यांचं नाव जोडलं जातं. स्पर्धेचं वातावरण निर्माण केलं जातं. पण, काही कलाकारांना मात्र या स्पर्धात्मक वातावरणाचा फारसा फरक पडत नाही. कारण, त्यांना या स्पर्धेत भाग होण्याचीच इच्छा नसते. असाच एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडमध्ये ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख ‘टेड टॉक्स- नयी सोच’ या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे येत्या काळात सलमान खान आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत त्याची स्पर्धा पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आपल्याला या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा नाही, हे खुद्द शाहरुखनेच स्पष्ट केलं आहे.

सलमान सध्या ‘बिग बॉस ११’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तर, अक्षयने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे ‘प्रामाणिकपणे सांगावं तर, सलमान आणि अक्षय त्यांच्या त्यांच्या मार्गांवर चालत आहेत. मी त्यांच्याशी स्पर्धा करु पाहातही नाही. कारण, त्यांच्या क्षेत्रात ते उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत’, असं शाहरुख ‘टेड टॉक्स’च्या लाँच शोमध्ये म्हणाला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या या वक्तव्यानंतर अनेकांनीच त्याच्या म्हणण्याचा दुहेरी अर्थ काढू नये यासाठी त्याने आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरणही दिलं. ‘स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा नाही याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की आमचा शो अगदीच वेगळा आहे. पण, टेड टॉक्स हा काही प्रमाणात एक वेगळा कार्यक्रम आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, ते करत असलेल्या गोष्टी जुनाट आहेत’, असं शाहरुख म्हणाला. सलमान आणि अक्षय कोणत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. मात्र, ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमाची संकल्पनाच वेगळी आहे, असंही त्याने स्पष्ट केलं. यावेळी शाहरुखने ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमाच्या मूळ संकल्पनेविषयीही उपस्थितांना माहिती दिली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या काही मंडळींना या कार्यक्रमात आमंत्रित करुन शाहरुख त्यांचे अनुभव आणि यशोगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.