‘नजर जो तेरी लागी मै दिवानी हो गई’, असं म्हणत अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या समोर आली की अनेकांच्याच हृदयाचा ठोका चुकतो. पण, दीपिकाच्या हृदयाचा ठोका नेमका कोणत्या क्षणाला चुकला होता, हे तुम्हाला माहती आहे का? खुद्द दीपिकाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील सर्वात ‘रोमॅण्टिक’ क्षणाचा उलगडा केला.

या खास रोमॅण्टिक क्षणाविषयी सांगताना दीपिका म्हणाली, “सर्वात ‘रोमॅण्टिक’ क्षणाविषयी सांगावं तर तसे बरेच क्षण माझ्या आयुष्यात आले आहेत. पण, अशा एका खास क्षणाचा उल्लेख करायचा झाला तर, मी एक आठवण सांगू इच्छिते. ज्यावेळी मी एक वाद्य शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्य म्हणजे ती इच्छा व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ते वाद्य माझ्या घरी पोहोचलं होतं.”

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…

दीपिकाने शेअर केलेली ही आठवण २०१२ मधील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रणबीर कपूर या खास मित्रानेच तिला पियानो भेट तर दिला नसेल? असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर आणि दीपिका सध्या खूप चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्रीचं नातं टिकून आहे. इतकंच काय, तर विविध कार्यक्रमांमध्येही दोघेजण एकत्र वावरताना, मौजमस्ती करताना दिसतात. दीपिकाला हा पियानो ज्यावेळी भेट देण्यात आला तेव्हाही हे दोघं एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होते, अशी चर्चा आहे. दीपिकाने तिच्या आयुष्यातील सर्वात ‘रोमॅण्टिक’ क्षण सर्वांना सांगितला खरा. पण, तिने या क्षणामागे दडलेल्या ‘त्या’ व्यक्तीचं नाव मात्रं सांगितलं नाही. त्यामुळेच दीपिकाला पियानो भेट देणारी व्यक्ती रणबीर होता की रणवीर, हा चाहत्यांच्या मनातील प्रश्न अनुत्तरितच आहे.